मुंबई : अंधेरी परिसरात २३ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. यावेळी आत्महत्येपूर्वी तिने व्हिडिओ बनवला होता. तसेच तीन पानांची चिठ्ठीही लिहिली होती. प्रेमसंबधात होणाऱ्या त्रासाला कंटाळून तरूणीने आत्महत्या केल्याचे आईने तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अंबोली पोलिसांनी प्रियकराविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी प्रियकर ठाणे पोलीस दलात कार्यरत आहे.

मृत तरुणीच्या ५० वर्षीय आईच्या तक्रारीवरून अंबोली पोलिसांनी भारतीय न्याय संहिता कलम १०८ अंतर्गत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. तक्रारीनुसार, आरोपीने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिला दोनवेळा गर्भवती केले होते. तसेच दोनवेळा गर्भपातही केला होता. तसेच आरोपीला दारू पिण्याचे व्यसन असल्यामुळे आरोपी तिच्याकडून पैसेही घ्यायचा, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मुलगी दुसऱ्या धर्मातील असल्यामुळे आरोपीच्या कुटुंबाकडून लग्नाला विरोध होता, असा आरोपही तक्रारी करण्यात आला आहे.

राहत्या घरी गळफास

तरूणी आई व बहिणीसह अंधेरी परिसरात राहत होती. तिची आई प्रार्थना करण्यासाठी चर्च मध्ये गेली असता तरूणीने सिलिंग फॅनला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. तरूणीची आई घरी आली असता मुलीने दरवाजा उघडला नाही. अखेर शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडण्यात आला. त्यावेळी मुलीने गळफास घेतला होता. ओढणी कापून तरूणीला तातडीने जुहू येथील कुपर रुग्णालयात नेण्यात आले. तेथील डॉक्टरांनी तरूणीला मृत घोषित केले.

मृत्यूपूर्वी व्हिडिओ बनवला होता

आत्महत्येनंतर तरूणीच्या आईने तिचा मोबाईल तपासला असता तिने प्रियकराला उद्देशून व्हिडिओ बनवला होता. तो व्हॉट्सअपवर बनवला होता. पण तिने तो प्रियकराला पाठवला नाही. तो व्हिडिओ डिलीट होऊ नये, म्हणून तिच्या आईने तो व्हिडिओ प्रियकराला पाठवला. याशिवाय मृत तरूणीने मृत्यूपूर्वी तीन पानांची चिठ्ठी लिहिली होती. त्यात प्रियकराला भेटल्यापासून आतापर्यंतचा घटनाक्रम लिहिला होता. दारूसाठी पैसे दिल्याची माहिती लिहिण्यात आली होती. आरोपी मोबाईल सेक्ससाठी तिच्यावर दबाव टाकायचा. आरोपी तिच्यावर विवस्त्र छायाचित्र पाठवण्यासाठी दबाव टाकायचा, असा आरोपी तक्रारीत करण्यात आला आहे.

गुन्हा दाखल मृत तरूणीच्या आईच्या तक्रारीवरून बुधवारी अंबोली पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तो ठाणे पोलीस दलात कार्यरत आहे. आरोपीला आई-वडील नसल्यामुळे तो आत्याकडे राहतो. या प्रेमसंबंधाला आत्या वआरोपीच्या बहिणीचाही विरोध होता, असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.