उत्तराखंडमधील १३ हजार फूट उंच केदारकांठावर चढाई करून २३ वर्षीय तरुणाने ‘आरे जंगल वाचवा’चा संदेश दिला.
ठाण्यात राहणारा गिर्यारोहक सौरभ करंबेळकर ‘आरे वाचवा’, पर्यावरण जागृती मोहिमेत सक्रिय आहे. आरे जंगल वाचवण्याचा संदेश सर्वदूर पसरावा यासाठी केदारकंठ येथे चढाई केल्यानंतरही त्याने आरे वाचवाचा संदेश दिला. त्याने १० जानेवारी रोजी ठाण्याहुन उत्तराखंड जाण्यासाठी मार्गक्रमण केले. त्यानंतर १३ जानेवारी रोजी केदारकांठाच्या पायथ्याशी पोहचून सलग तीन दिवस त्याने यशस्वी चढाई केली.
हेही वाचा >>> मुंबई : ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू ; ट्रक चालक अटकेत
उत्तराखंडमधील केदारकंठाची चढाई गिर्यारोहकांना कायम आकर्षित करते. ही चढाई अत्यंत जोखमीची आणि अनेक धोके पत्करून करावी लागते. संपूर्ण तयारीनिशी सौरभने एकट्याने चढाईला सुरुवात केली. दिवसा १ अंश आणि रात्री साधारण उणे ५ अंश तापमानात, पाठीवर सुमारे आठ किलोचे वजन घेऊन तीन दिवस १३ हजार फूट उंचीवर चढाई करण्याचे आव्हान त्याने पूर्ण केले.
हेही वाचा >>> मुंबई : वर्षभरात १६ हजाराहून अधिक अनधिकृत जाहिराती, फलक हटवले, धार्मिक, राजकीय फलकांची संख्या अधिक
कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-३ मार्गाचे कारशेडच्या बांधणीसाठी २ हजार ७०० झाडे रात्री तोडण्यात आली होती. त्यानंतर पर्यावरणप्रेमींना ‘आरेचे जंगल वाचवण्यासाठी जनआंदोलन उभे केले. त्यानंतर अनेक राजकीय चढ-उतारात आरे बाबतची सत्ताधाऱ्यांची भूमिका बदलत राहिली. सद्यस्थितीत सरकारने आरेमध्येच कारशेड करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी ८४ झाडे तोडण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाने दिली. परंतु, मुंबई मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशनने (एमएमआरसीएल) १७७ झाडे कापण्याची परवानगी पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे मागितली. त्यावर पर्यावरणवाद्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.