मुंबई : महत्त्वाकांक्षी ठाणे-बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पास अखेर केंद्रीय वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र या कामासाठी आता १२२ ऐवजी २३५ झाडे कापावी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रातील ही झाडे आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) ठाणे ते बोरिवली अंतर केवळ २० मिनिटात पार करता यावे यासाठी ठाणे – बोरिवलीदरम्यान ११.८ किमी लांबीचा दुहेरी भुयारी मार्ग बांधण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी एमएमआरडीएकडून बांधकामाचे कंत्राट अंतिम करण्यात आले आहे. हैदराबाद येथील मेघा इंजिनीयरिंग इन्फ्रास्ट्रक्चर्स प्रायव्हेट लिमिटेडला हे कंत्राट देण्यात आले आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक केंद्रीय वन्यजीव मंडळ आणि राज्य वन्यजीव मंडळाची परवानगी मिळाली आहे. त्यामुळे आता लवकरच भूमिपूजन करून या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. दरम्यान या प्रकल्पासाठी संजय गांधी राष्ट्रीय उद्यान क्षेत्रात भुयारीकरणासाठी आवाढव्य टीबीएम यंत्र भूगर्भात सोडण्यासाठी २७ ठिकाणी बोअर करावी लागणार आहेत. यातील १५ बोअर सहा इंच परिघाची असून ही १५ बोअर संरक्षित क्षेत्र तसेच पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात असून यासाठी उद्यान क्षेत्रातील १२२ झाडे कापावी लागणार असल्याची माहिती राज्य वन्यजीव मंडळाकडे एमएमआरडीएने सादर केलेल्या प्रस्तावातुन समोर आले होते.
हेही वाचा…मुंबईत आता बांबूची लागवड, पालिकेचा शहरी हरितीकरणाचा प्रकल्प
आता मात्र कापल्या जाणाऱ्या झाडांच्या संख्येत वाढ झाल्याची माहिती समोर आली आहे. आता १२२ ऐवजी २३५ झाडे कापली जाणार आहेत. कापल्या जाणाऱ्या झाडांच्या मोबदल्यात एमएमआरडीएला इतरत्र वनीकरण करावे लागणार आहे. त्यानुसार संभाजी नगर येथील फुलंब्रीतील उमरावती येथील ३५.५३ हेक्टर जागा वनीकरणासाठी निश्चित करण्यात आली आहे.