लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : पश्चिम रेल्वेवरील खार ते गोरेगाव दरम्यान ११ दिवसांचा ब्लॉक घेऊन सहाव्या मार्गिकेचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामाचा अंतिम टप्पा ४-५ नोव्हेंबर रोजी असणार आहे. यावेळी २४ तासांचा ब्लॉक घेऊन रेल्वे मार्ग जोडण्याचे काम पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर या कामाची पाहणी रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीआरएस) ५, ६ नोव्हेंबर रोजी करण्यात येणार आहे. या पाहणीनंतरच सहावी मार्गिका सुरू करण्यास सुरक्षित आहे की नाही हे ठरणार आहे.

खार – गोरेगावदरम्यान ८.८ किमी लांबीच्या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी पश्चिम रेल्वेने ७ ऑक्टोबरपासून ब्लॉक घेण्यास सुरुवात केली. हा ब्लॉक ५ नोव्हेंबरपर्यंत असून तब्बल २९ दिवसांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. या ब्लॉक कालावधीत गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूझ आणि वांद्रे टर्मिनस अशा सहा यार्डमधील नॉन-इंटरलॉकिंगचे काम करण्यात आले आहे. तसेच एकूण २० पॉईंटचे काम कोणत्याही लोकल व्यत्ययाशिवाय करण्यात आले. ७ ते २६ ऑक्टोबरदरम्यान सुमारे ५ तासांचे रात्रकालीन ब्लॉक घेण्यात आले.

आणखी वाचा-मुंबई : मराठा आंदोलनामुळे एसटी महामंडळाला २० कोटी रुपयांचा फटका

२७ ऑक्टोबरपासून ४ ते १० तासांचे विशिष्ट कालावधीत ब्लॉक घेण्यात आले. त्यामुळे दररोज १०० ते २५० लोकल फेऱ्या रद्द झाल्या. तसेच नॉन इंटरलॉकच्या केलेल्या कामांमुळे यार्डजवळील रेल्वेगाडीचा वेग ३० किमी प्रतितास प्रतिबंधित करण्यात आला. त्यामुळे अनेक लोकल विलंबाने धावल्या. एक तासाच्या लोकल प्रवासाला दोन ते तीन तास लागले. तर आता ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजल्यापासून ५ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेपर्यंत २४ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकच्या वेळी १०० लोकल फेऱ्या आणि ९ लांबपल्ल्याच्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात येणार आहेत. तसेच २५ रेल्वेगाड्या अंशतः रद्द करण्यात येणार आहेत. परिणामी, शनिवार आणि रविवारी लोकल प्रवास करणे अवघड होणार आहे.

आणखी वाचा-कर्करोग रुग्णांना आता स्वतः ठरवता येणार उपचाराची दिशा; टाटा रुग्णालयाचा नवा उपक्रम

६ नोव्हेंबरपर्यंत पश्चिम रेल्वेवरील सहाव्या मार्गिकेचे काम पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यावर, पश्चिम रेल्वेचा प्रवास सुरळीत आणि वक्तशीर होईल. त्यानंतर गोरेगाव – बोरिवली सहाव्या मार्गिकेचे काम हाती घेतले जाईल, असे पश्चिम रेल्वेचे मुंबई सेंट्रल विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज वर्मा यांनी सांगितले.

सध्या पश्चिम रेल्वेवरील पाचव्या मार्गिकेवरील रेल्वे वाहतुकीचा भार अधिक आहे. सहावी मार्गिका पूर्ण झाल्यास, रेल्वे वाहतूक विभाजित करणे शक्य होईल. तसेच नवीन लोकल आणि रेल्वेगाड्या वाढवण्यास वाव मिळेल.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 hour block on western railway on november 4th and 5th mumbai print news mrj