मुंबई : केईएम रुग्णालयामधील डॉक्टरांची सेवा दुपारी ४ वाजेपर्यंत असल्याने नियोजित शस्त्रक्रिया सायंकाळनंतर होत नाहीत. त्यामुळे अनेक रुग्णांना शस्त्रक्रियेसाठी वाट पाहावी लागते. मात्र लवकरच केईएम रुग्णालयामध्ये २४ तास नियोजित शस्त्रक्रिया करण्यात येतील, असे आश्वासन मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. सुधाकर शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या शिष्टमंडळाला दिले. रुग्णालयातील अनागाेंदी कारभाराविरोधात प्रशासनाला जाब विचारण्यासाठी ठाकरे गटातर्फे मंगळवारी सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात आला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केईएम रुग्णालयातील अपुरा औषधांचा पुरवठा, रुग्णालयातील बंद असलेले सहा विभाग, परिचारिका कक्ष सेवक, तंत्रज्ञ, डॉक्टर यांच्या अपुऱ्या संख्येमुळे रुग्णांची होणारी गैरसाेय, शस्त्रक्रियेची तारीख मिळण्यास होणारा विलंब, व्हिलचेअर व स्ट्रेचरची कमतरता, अपुऱ्या सोनोग्राफी यंत्रांमुळे रुग्णांना होणारा त्रास, रुग्णालयातील अस्वच्छता, खासगी लॅबमधील कर्मचाऱ्यांचा रुग्णालयातील वावर, वारंवार बंद पडमारी एमआरआय, सीटी स्कॅन, एक्स-रे आदी यंत्रे, सुरक्षा रक्षकांची अपुरी संख्या आणि त्यांच्याकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांना मिळणारी वाईट वागणूक, डॉक्टरांची गैरवर्तणूक, रिक्त पदे आदी विविध समस्यांसाठी मंगळवारी सकाळी ११ वाजता ठाकरे गडाच्या शिष्टमंडळाने डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेतली.

हेही वाचा >>> मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये ‘रुग्ण मित्र’ मदतकक्ष

खासदार अरविंद सावंत, आमदार अजय चौधरी, माजी आमदार दगडू सकपाळ, माजी नगरसेवक सचिन पडवळ आणि आशिष चेंबूरकर यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेना शाखा क्रमांक २०६ पासून केईएम रुग्णालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत आणि मध्यवर्ती खरेदी कक्षाचे प्रमुख विजय बालमवार यांची ठाकरे गटाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली. मात्र त्यावर समाधानकारक उत्तर न मिळाल्याने त्यांनी थेट डॉ. सुधाकर शिंदे यांची भेट घेण्याचा निर्णय घेत आपला मोर्चा मुंबई महानगरपालिका कार्याल्याच्या दिशेने वळवला.

हेही वाचा >>> गिरगावातील इमारत धोकादायक घोषित न करण्यासाठी दबाव? आयआयटीच्या अहवालाकडे काणाडोळा

चर्चेदरम्यान डॉ. सुधाकर शिंदे यांनी चार मागण्यांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची तयारी दर्शविली. त्यानुसार केईएम रुग्णालयात २४ तास नियोजित शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. शस्त्रक्रियानिहाय भूलतज्ज्ञांना मानधन देण्याचे तसेच यासंदर्भात नियमावली तयार करण्याचे आदेश डॉ. सुधाकर शिंदे यांनी केईएम अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांना दिले. अधिष्ठात्यांना २० लाखांपर्यंत औषधे खरेदी करण्याची मुभाही देण्यात आली.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 24 hour scheduled surgery to be held at kem hospital mumbai print news ysh
Show comments