महाड दुर्घटनेनंतर सरकारला जाग
महाडमधील सावित्री नदीवरील पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर खबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता राज्यातील ब्रिटीशकालीन पुलांवर २४ तास पहारा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार अतिजुन्या अशा २०० पुलांवर पावसाळ्याचे पुढील दोन महिने अहोरात्र लक्ष ठेवण्यात येणार असून त्यासाठी प्रत्येक पुलावर कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे.
काही दिवसांपूर्वी मुंबई-गोवा महामार्गावर महाड येथील सावित्री नदीवरील पुल कोसळून झालेल्या दुर्घटनेत ३० हून अधिक लोकांना प्राण गमवावे लागले विशेष म्हणजे पावसाळ्यापूर्वीच हा पूल चांगल्या स्थितीत असल्याचा निर्वाळा सार्वजकि बांधकाम विभागाच्या अभियंत्यानी दिला होता. मात्र पावसात नदीला आलेल्या पुरात हा पूल पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे वाहून गेला आणि अनेक कुटुंबे उघडय़ावर पडली. या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा सरकारने पुर्वीच केली आहे. महाडच्या दुर्घटनेनंतर खडबडून जागे झालेल्या सार्वजनिक बांधकाम विभागाने आता राज्यातील ब्रिटीशकालीन सर्वच पुलांची शास्त्रोक्त तपासणी करण्याच निर्णय घेतला आहे. त्यानुसार केंद्राने नियुक्त केलेल्या संस्थांच्या माध्यमातून ही तपासणी करण्यात येणार आहे.
ब्रिटीशकालीन पुलांच्या तपासणीस विलंब लागणार असल्याने पावसाळ्यात महाडच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी सर्व महत्वाच्या पुलांवर आता २४ तास पहारा ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विशेषत: महामार्गावरील किंवा मोठय़ा नदींवरील पूलावर नजर ठेवण्यात येणार आहे. त्यासाठी प्रत्येक पुलावर बांधकाम क्षेत्राचा अनुभव असलेल्या व्यक्तींची नेमणूक करण्यात येणार असून या व्यक्ती नदीच्या पाण्याच्या पातळीत होणारे बदल, पुलाच्या एकाद्या भागाला निर्माण झालेला धोका किंवा पडझड यांची माहिती त्वरित जिल्ह्य़ाच्या आपत्तकालीन नियंत्रण कक्षाला देईल. त्यामुळे पुढील दुर्घटना टळतील अशी सार्वजनिक बांधकाम विभागाची धारणा आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पावसाळ्याचे पुढील दोन महिन्यांसाठी ही योजना आखण्यात आली असून त्याबाबतचे निर्देश सर्व संबधितांना देण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.
केंद्रही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करणार
केंद्र सरकारनेही महाड पूल दुर्घटनेनंतर देशातील ब्रिटीशकालीन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा निर्णय घेतला आहे. बांधकाम क्षेत्रातील तज्ज्ञ संस्थांच्या माध्यमातूून ही तपासणी करण्यात येणार असून त्यातून या पुलांची सध्यस्थिती वाहतूकीस योग्य आहे का, त्याची कोणत्या प्रकारे दुरूस्ती करण्याची गरज आहे किंवा तो पूल पाडण्याची आवश्यकता आहे याबाबतचे चित्र स्पष्ट होणार असून पावसाळा संपताच ही तपासणी होणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता (महामार्ग) विनय देशपांडे यांनी दिली.