यापुढे राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये २४ तास शवविच्छेदनाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत दिले. त्याचप्रमाणे वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दर्जेदार निवासस्थानाची व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यातील वैद्यकीय महाविद्यालये तसेच शवविच्छेदन केद्रांमध्ये सूर्यास्तानंतर शवविच्छेदन केले जात नव्हते. रस्त्यावरील अपघातात मृत्यू पावणाऱ्या व्यक्तींच्या नातेवाकांची यामुळे प्रचंड ओढाताण होत असे. बदलते तंत्रज्ञान लक्षात घेऊन २४ तास शवविच्छेदन सुविधा उपलब्ध करून देण्याचे धोरण आव्हाड यांनी जाहीर केले.
त्याचप्रमाणे वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या निवासासाठी सर्वोत्तम निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याचेही त्यांनी जाहीर केले. वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये दर्जेदार शिक्षण मिळावे, पुरेशा अध्यापकांची नियुक्ती तसेच पदवी व पदव्युत्तर जागांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ करण्यासाठी तात्काळ उपाययोजना केल्या जातील, असेही वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले. १४ शासकीय वैद्याकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठात्यांकडून त्यांच्या महाविद्यालयाचे ‘व्हिजन डॉक्युमेंट’ घेण्यात येणार असून या सर्व महाविद्यालयांत डायलिसिसची सुविधा माफक दरात सुरू करण्याचीही आपली योजना असल्याचे आव्हाड यांनी सांगितले.

Story img Loader