मुंबई : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या पहिल्याच महाराष्ट्र दौऱ्याच्या वेळी मुंबईत राजभवन येथे आयोजित केलेल्या स्वागत समारंभावर व सांस्कृतिक कार्यक्रंमावर २४ लाख ७० हजार रुपये खर्च झाल्याचे दाखविण्यात आले असून, राज्य शासनाने त्याला मान्यता दिली आहे.
देशाच्या राष्ट्रपतीपदी निवड झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू या जुलैच्या पहिल्या आठवडय़ात राज्याच्या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी नागपूर व नंतर मुंबईत त्यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम पार पडले. राज्य शासनाच्या वतीने मुंबईत राजभवनात त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, विधानसभेचे अध्यक्ष अॅड. राहुल नार्वेकर, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रशासकीय व वित्तीय मान्यता
राष्ट्रपतींच्या नागरी सत्कारानंतर, सायंकाळी महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यात महाराष्ट्राची लोककला दिवली नृत्य, गोंधळ, पंढरीची वारी, शिवराज्यभिषेक सोहळा इत्यादी कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले. राज्याच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने आयोजित हा सांस्कृतिक कार्यक्रम व त्याच्या आयोजनासाठी २४ लाख ७० हजार रुपये खर्च दाखविण्यात आला आहे. याच विभागाने गुरुवारी एक शासन आदेश काढून या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे.