धुळीने माखलेल्या बसगाडय़ा, तुटलेल्या खिडक्यांच्या तुटलेल्या दांडय़ा, मध्येच फाटलेला पत्रा आणि त्यामुळे चांगल्या कपडय़ांचा उडणारा टवका, आसनांखाली पडलेला कचरा.. एसटी महामंडळाने आपल्या गाडय़ांची ही प्रतिमा बदलण्यासाठी कंबर कसली असून मार्च २०१६पर्यंत २४ आगारांत नवीन स्वयंचलित धुलाई यंत्रे बसवण्याचा निर्णय घेतला आहे. महामंडळाने मार्च २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत तब्बल ५० नवीन यंत्रे बसवली आहेत. त्यामुळे येत्या काळात एसटीच्या प्रवाशांना अधिक स्वच्छ गाडय़ांमधून प्रवास करण्याचा अनुभव मिळणार आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात १५ हजार ६१२ बसगाडय़ा आहेत. त्यापैकी १३,८२७ बसगाडय़ा हिरकणी, परिवर्तन या प्रकारातील आहेत. एसटी महामंडळाच्या बहुतांश गाडय़ा अनेकदा आगाराबाहेर निघताना खराब असल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आल्या होत्या.
एसटीची प्रत्येक बसगाडी धुतल्याशिवाय आगाराबाहेर न काढण्याचे आदेश एसटीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक व उपाध्यक्ष दीपक कपूर यांनी दिले होते. त्यानंतर एसटीमध्ये अद्ययावत अशी स्वयंचलित धुलाई यंत्रे खरेदी करण्याचाही निर्णय झाला.
या निर्णयानुसार मार्च २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत ५० स्वयंचलित यंत्रे एसटीने विकत घेतली आहेत. तर आणखी २४ नवीन यंत्रे लवकरच महामंडळाच्या आगारांत बसवली जाणार आहेत. ही यंत्रे कुठे बसवायची, याबाबत लवकरच निर्णय होणार असल्याचे एसटीतील सूत्रांनी सांगितले.
या स्वयंचलित धुलाई यंत्रांद्वारे एसटीची आंतर्बाह्य़ स्वच्छता होते. तसेच धुलाईसाठी वेळही कमी लागतो. परिणामी कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त बसगाडय़ा स्वच्छ होतील, असे सूत्रांनी स्पष्ट केले. एसटीतील आसनांखालील कचरा, बसगाडय़ांमध्ये फिरणारी झुरळे, डास, पानाच्या पिंकांचे डाग आदी गोष्टींमुळे प्रवाशांना एसटीतून प्रवास करणे नकोसे झाले होते. गेल्या वर्षभरात एसटीची प्रवासी संख्या १२ कोटींनी कमी झाली आहे.

Story img Loader