उत्तराखंड येथे नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या राज्यातील २४० प्रवाशांना नवी दिल्ली येथून शनिवारी रेल्वेने महाराष्ट्रात पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत २१५० यात्रेकरू व पर्यटकांशी संपर्क साधण्यात आल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन केंद्राच्या सचिव व संचालक आय.ए. कुंदन यांनी दिली. भाविकांना सुखरूप पोचविण्यासाठी आणखी ५० लाख रुपये मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी जाहीर केले असून भाविकांच्या सुखरूप बाहेर काढण्यासाठी दोन हेलिकॉप्टरही रवाना केली आहेत.
उत्तराखंडमध्ये अडकलेल्या राज्यातील यात्रेकरू व पर्यटकांसाठी डेहराडून, हरिद्वार, सहस्त्रधारा, ऋषिकेश आणि डेहराडून येथील जॉली ग्रँड एअरपोर्ट या पाच ठिकाणी मदत शिबीरे सुरू केली आहेत. त्यासाठी ४५ अधिकाऱ्यांची नियुक्ती केली असून प्रधान सचिव आर.ए. राजीव, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य मिशनचे संचालक विकास खारगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही पथके कार्यरत आहेत.
उत्तरखंडमधील राज्यातील शेवटचा भाविक बाहेर पडेपर्यंत शासनाची मदत सुरू राहणार असून त्यांची सुखरूप सुटका करण्यासाठी दोन हेलिकॉप्टर पाठविण्यात आली आहेत. तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक, प्रधान सचिव दर्जाच्या दोन अधिकाऱ्यांसह ३० अधिकारी पाठविण्यात आले आहेत. बचाव कार्यासाठी उत्तराखंड सरकारला १० कोटी रूपये देण्यात आले आहेत. विविध माध्यमातून भाविकांच्या मदतीसाठी २५ कोटी रूपयेही उपलब्ध झाले आहेत.
मदत कार्यातील अधिकाऱ्यांचे दूरध्वनी क्रमांक
आर.ए. राजीव  ९१-९१६७०८००७०, विकास खारगे ९१-९९३०१५४९९९, प्रदीप कुमार ९१-९८६८१४०६६३, जयकृष्ण पहाड (हृषिकेश) ९१-८९७५१७८१२२, नंदिनी आवडे(डेहराडून) ९१-९८६८८६८२८६, प्रशांत कापडे (हरिद्वार) ९१-९८९२२१७९५५, प्रवीण टाके (नवी दिल्ली) ९१-९७१७१४०४९५, नितीन मुंडावरे (सहस्त्रधारा सिव्हील एअरपोर्ट) ९१-९४२११०५७२६