मांडवा वॉटर टॅक्सी सेवा सुरू होऊन दोन आठवडे पूर्ण झाले असून या दोन आठवड्यांत २,४०३ प्रवाशांनी देशातील सर्वात मोठ्या वॉटर टॅक्सीतून प्रवास केला आहे. तूर्तास या सेवेला प्रतिसाद कमी आहे. मात्र भविष्यात त्यात वाढ होईल, असा विश्वास कंत्राटदार कंपनीकडून व्यक्त करण्यात येत आहे.
नयनतारा शिपिंग प्रायव्हेट लिमिटेडच्या मालकीची २०० प्रवाशी क्षमतेची वॉटर टॅक्सी १ नोव्हेंबरपासून मुंबई डोमेस्टिक क्रूझ टर्मिनल – मांडवा अशी धावू लागली आहे. या सेवेमुळे मुंबईहून मांडव्याला केवळ ४० ते ४५ मिनिटांत पोहचणे शक्य झाले आहे. देशातील सर्वात मोठ्या वॉटर टॅक्सीतून मुंबईकरांना प्रवास करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्यानुसार आतापर्यंत, दोन आठवड्यात या वॉटर टॅक्सीतून २४०३ प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती नयनतारा कंपनीने दिली.