लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : रस्त्यांच्या काँक्रीटीकरणामुळे मुंबईकर त्रासलेले असतानाच झाडांचेही खूप नुकसान होत असल्याचे निदर्शनास आले आहे. रस्त्याच्या कामासाठी खोदकाम करताना संपूर्ण मुंबईत आतापर्यंत २४१३ झाडांच्या मुळाना धक्का लागला आहे. उद्यान विभागाने आतापर्यंत तब्बल ३७८ प्रकरणात नोटीसा बजावल्या आहेत. तर रस्त्याचे काम सुरू असताना झाड उन्मळून पडल्यामुळे सात ठिकाणी कंत्राटदाराविरोधात पोलिसात तक्रार करण्यात आली आहे.
मुंबईत सध्या मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे काँक्रीटीकरण सुरू आहे. त्याकरीता मोठ्या प्रमाणावर रस्ते खोदले जात आहेत. तसेच उपयोगिता वाहिन्या टाकण्यासाठी पदपथही खोदले जात आहेत. त्यामुळे पदपथाच्या कडेला, रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांच्या मुळांना धक्का लागत आहे. अनेक ठिकाणी झाडांची मुळे कापली गेल्यामुळे झाडे कलली आहेत. त्यामुळे उद्यान विभागाने काही दिवसांपूर्वी उपअधिक्षकांना झाडांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
ज्या झाडांना काँक्रीटीकरणाच्या कामामुळे धक्का लागला आहे, ज्या झाडांची मुळे कापली गेली आहेत अशा झाडांची नोंद घेतली जात आहे. तसेच या झाडांचा समतोल राखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिकेच्या उद्यान विभागाने केलेल्या सर्वेक्षणात रस्त्याची कामे सुरू असताना मोठ्या प्रमाणावर झाडांचे नुकसान झाल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे उद्यान विभागाने पालिकेच्या रस्ते विभागाला व पर्जन्य जल वाहिन्या विभागाला नोटीसा दिल्या आहेत.
‘खोदकाम करताना काळजी घ्या’
दरवर्षी मुंबईत पावसाळ्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे झाडे उन्मळून पडतात. त्यामुळे पादचाऱ्यांना जीवही गमवावा लागतो. त्यामुळे उद्यान विभागाने यंदा विशेष खबरदारी घेतली असून रस्त्याच्या कंत्राटदारांना खोदकाम करताना काळजी घेण्याचे आवाहन नोटिसांद्वारे केले आहे.
विभागांनी कंत्राटदारावर कारवाई करावी
ऑक्टोबरपासून मुंबईत रस्त्यांची वेगाने कामे सुरू आहेत. रस्त्यांच्या काँक्रीटीकरणादरम्यान झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी आतापर्यंत ३७८ प्रकरणात नोटीसा देण्यात आल्या आहेत. रस्त्याची कामे सुरू असताना पर्जन्यजलवाहिन्या टाकणे, मलनिस्सारण वाहिन्या टाकणे ही कामे देखील केली जातात. त्याकरीता रस्ता खोदताना झाडांचे नुकसान होते. त्यामुळे ज्या विभागाचे काम सुरू असताना झाडाचे नुकसान झाले त्या विभागाला या नोटीसा देण्यात आल्या आहेत. पुढे त्या त्या विभागांनी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करावी असे अपेक्षित आहे.
गोरेगावमध्ये झाडांचे अधिक नुकसान
सर्वाधिक ६४ नोटीसा या गोरेगाव परिसरात दिलेल्या आहेत. तर त्याखालोखाल वांद्रे पश्चिममध्ये ५५, बोरिवलीत ५१, मालाडमध्ये ४५, कांदिवलीत ३५ नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.
सात प्रकरणात पोलीस तक्रार
ज्या रस्त्याच्या कामादरम्यान झाड पडले आहे अशा प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी करण्यात आल्या आहेत. आतापर्यंत सात प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मालाडमध्ये सर्वाधिक पाच प्रकरणी पोलिसात तक्रार करण्यात आली आहे. तर अंधेरी पूर्व आणि पश्चिममधील प्रत्येकी एका प्रकरणात तक्रार करण्यात आली आहे. पोलिसात तक्रार केल्यानंतर या प्रकरणी आता ‘महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) वृक्ष संरक्षण व संवर्धन अधिनियम, १९७५’ अंतर्गत कारवाई केली जाणार आहे.
उद्यान विभाग सतर्क
रस्ते काँक्रीटीकरणाच्या कामादरम्यान झाडांचे नुकसान केल्याप्रकरणी यंदा उद्यान विभागाने कठोर पावले उचलली आहेत. प्रभादेवीमध्येही गेल्या आठवड्यात झाडांचे नुकसान केल्या प्रकरणी रस्ते कंत्राटदाराला पालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली. तसेच २० हजार रुपयांचे दंड केला. प्रभादेवीतील राजाभाऊ देसाई मार्गावर रस्त्याचे काम सुरू असताना झाडांच्या मुळांना धक्का लागल्यामुळे ही कारवाई उद्यान विभागाने केली आहे. त्याआधी रस्त्याचे कॉंक्रीटीकरण करत असताना झाडाच्या बुंध्यालगत काँक्रीटीकरण केले म्हणून काही दिवसांपूर्वी विमानतळ प्राधिकरणाला पालिकेच्या उद्यान विभागाने नोटीस बजावली होती.