मुंबई : महारेरा नोंदणीकृत प्रकल्पांनी दर तीन महिन्यांनी प्रकल्पांबाबतची माहिती अद्ययावत करणे बंधनकारक आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या प्रकल्पांविरोधात महारेराने कडक कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार जानेवारीत नोंदणी झालेल्या प्रकल्पांविरोधात कारवाई सुरू असतानाच आता फेब्रुवारीत नोंदणी झालेल्या ७०० पैकी २४८ प्रकल्पांनी माहिती अद्ययावत न केल्याने त्यांची नोंदणी महारेराने स्थगित केली आहे. मार्चमधील २२४ प्रकल्पांनीही या नियमाचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे या प्रकल्पांविरोधातही स्थगितीची कारवाई होण्याची शक्यता आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

रेरा कायद्यानुसार प्रकल्पात किती घरे विकली गेली, त्यातून किती रक्कम मिळाली, किती खर्च झाला, आराखड्यात काही बदल झाला आहे का अशी अनेक प्रकारची माहिती संकलित करत प्रत्येक प्रकल्पातील संबंधित विकासकाने ही माहिती दर तीन महिन्याने प्रपत्र १, २ आणि ३ च्या माध्यमातून महारेराकडे सादर करणे आवश्यक असते. त्यानंतर ही माहिती ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यासाठी ती महारेराच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाते. मात्र या नियमाचे मोठ्या संख्येने उल्लंघन होत असल्याने महारेराने आता अशा प्रकल्पाविरोधात कारवाई सुरू केली आहे. त्यानुसार जानेवारीत नोंदणी झालेल्या आणि नियमाचे उल्लंघन केलेल्या प्रकल्पांविरोधात कारवाई सुरू आहे. आता फेब्रुवारीतील ७०० पैकी ४८५ प्रकल्पांना कलम ७ अंतर्गत प्रकल्प स्थगितीची नोटीस दिल्यानंतर २३७ प्रकल्पांनी माहिती अद्ययावत केली आहे. माहिती अद्ययावत न करणाऱ्या २४८ प्रकल्पांची नोंदणी महारेराने सर्व विनियामक प्रक्रिया पूर्ण करून स्थगित केली आहे.

हेही वाचा – केंद्रातील प्रतिनियुक्तीत राज्याचे बळ तोकडे; ९० जागा असताना सध्या २५ अधिकारीच केंद्रात

जानेवारी, फेब्रुवारी प्रमाणे मार्चमधील ४४३ पैकी २२४ प्रकल्पांनी विहित माहिती अद्ययावत केली नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या प्रकल्पांनाही कलम ७ अंतर्गत प्रकल्प स्थगितीची नोटीस बजावण्यात आली आहे. या प्रकल्पांनी नोटीस मिळाल्यापासून ३० दिवसांत माहिती अद्ययावत केली नाही तर त्यांचीही महारेरा नोंदणी स्थगित केली जाणार आहे.

प्रकल्पांची नोंदणी स्थगित झाल्याने आता या प्रकल्पांची बँक खाती गोठविण्यात आली असून त्यांना प्रकल्पाची जाहिरात, पणन, सदनिकांची विक्री असे काहीही करता येत नाही. शिवाय या प्रकल्पातील कुठल्याही विक्री व्यवहाराची आणि साठेखताची नोंदणी न करण्याचे निर्देश महारेराकडून संबंधित उप निबंधकांना दिले आहेत. तेव्हा इच्छुक ग्राहकांनी घरखरेदी करताना महारेराच्या संकेतस्थळावरील प्रकल्पांची यादी तपासत गृहखरेदी करणे आवश्यक आहे.

हेही वाचा – मुंबई : आत्महत्या करत असल्याचे छायाचित्र पाठवून पोलिसाची आत्महत्या

फेब्रुवारीतील स्थगित प्रकल्पांचा विभागनिहाय तपशील

मुंबई महानगर कोकणासह ठाणे ३९, पालघर १९, रायगड १४, मुंबई उपनगर १३, मुंबई ७. एकूण ९९

प. महाराष्ट्र – पुणे ४८, सातारा ९, कोल्हापूर ४, सोलापूर ३, सांगली ३. एकूण ६९

उत्तर महाराष्ट्र- नाशिक २३ , अहमदनगर ४ धुळे १. एकूण २८

विदर्भ – नागपूर ३१, अमरावती ३, चंद्रपूर, अकोला प्रत्येकी २ वर्धा, बुलडाणा प्रत्येकी १ एकूण ४०

मराठवाडा – छ. संभाजीनगर ८, जालना, बीड प्रत्येकी १ एकूण १०

दमण- २

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 248 projects registered in february followed by january did not update the information strict action by maharera mumbai print news ssb