मुंबईः पोलीस असल्याची बतावणी करून आसनगाव येथील शिक्षण संस्थेशी संबंधीत तिघांची २५ लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी टिळक नगर पोलिसांनी शनिवारी एका रिक्षा चालकाला अटक केली. आरोपीच्या दोन साथीदारांचीही ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. तक्रारदार चेंबूर परिसरात आले असता आरोपींनी रक्कम जप्त केल्याचे सांगून पळ काढला.
तक्रारदार शशिकांत डगळे आणि त्यांचा मित्र सुशील तळेले हे मंजुळधारा एज्युकेशन अॅण्ड सोशल ऑर्गनायझेशन या नावाने ट्रस्ट चालवतात आणि दोघांनी या संस्थेसाठी कल्याणमधील टोकवडे परिसरात जमीन खरेदी करायची होती. ती जमीन खरेदी करण्यासाठी डगळे आणि तळेले यांनी २५ लाख रुपयांच्या रोख रकमेची व्यवस्था केली होती. परंतु त्यांना जमीन खरेदी करण्यासाठी ट्रस्टच्या बँक खात्यात पैसे जमा करणे आवश्यक होते. डगळे आणि तळेले यांची २ नोव्हेंबररोजी दिलीप जाधव या मित्रामार्फत अमीत नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. रोख दिल्यास ती रक्कम खात्यात हस्तांतरीत करण्यात तो मदत करेल, असे तक्रारदार यांना सांगण्यात आले होते. त्यानुसार १४ नोव्हेंबरला डगळे, तळेले आणि जाधव यांनी घाटकोपरमधील एका हॉटेलमध्ये अमितची भेट घेतली. त्यावेळी आमीर नावाची व्यक्तीही तेथे होती. बांधकाम व्यवसायात असून त्याला रोख रक्कम दिल्यास तो खात्यात पैसे जमा करू शकतो, असे सांगण्यात आले. त्यानुसार २५ नोव्हेंबररोजी डगळे, तळेले आणि जाधव रोख रक्कम आणि ट्रस्टची कागदपत्रे घेऊन घाटकोपर परिसरात पोहोचले आणि अमीर येण्याची वाट पाहत होते. त्यांनी अमीरशी संपर्क साधला असता त्याने पैसे घेऊन जाण्यास दोन जणांना पाठवत आहोत, असे सांगितले.
हेही वाचा >>> मुंबईः कॅनडा येथे नोकरीचे आमिष दाखवून तीन तरुणांची फसवणुक
काही वेळाने घाटकोपर येथील राजावाडी पार्क येथे रिक्षातून दोघेजण आले आणि त्यांनी पोलीस असल्याचे सांगितले. कारवाई करण्याच्या बहाण्याने त्यांच्या बॅगेतील रोख रक्कम आणि मोबाईल जप्त केला आणि त्यांना पोलीस बीट क्रमांक ७ वर येण्यास सांगितले. दोघेही घटनास्थळावरून निघून गेले. पोलीस ठाण्यात चौकशी केल्यावर ती कारवाई खोटी होती, असे तक्रारदार यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी याप्रकरणी टिळक नगर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी तोतयागिरी व फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. याप्रकरणी तपासात रिक्षा चालक अर्शद खान याचा सहभाग असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. त्यानुसार त्याला याप्रकरणी अटक करण्यात आली. खान याच्या रिक्षातून आरोपी घटनास्थळी आले होते. चौकशीदरम्यान खान याने दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी अराफत खान व मुर्तझा खान यांचा याप्रकरणी सहभाग असल्याचे निष्पन्न झाले असून त्यांचा शोध सुरू आहे.