बेरोजगार तरुणाचे तुरुंगात जाण्यासाठी कृत्य
पश्चिम रेल्वे मार्गावरील चर्चगेट व मरिन लाइन्स स्थानकांदरम्यान उभ्या असणाऱ्या एका रिकाम्या लोकलमधील डबा पेटवून दिल्याप्रकरणी एका माथेफिरूला रेल्वे पोलिसांनी रविवारी अटक केली. पहाटे चारच्या सुमारास आकाश घोरडे (२८) या माथेफिरू तरुणाने तुरुंगात जाण्याच्या इच्छेतून ही आग लावण्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले.
रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा रात्री बंद झाल्यानंतर चर्चगेट आणि मरिन लाइन्स स्थानकादरम्यान अनेक लोकल थांबवण्यात येतात. त्यातील एका लोकलच्या महिला डब्याला एका माथेफिरूने रविवारी पहाटे चारच्या सुमारास आग लावली. हा तरुण मूळचा नागपूरचा असून, त्याची मानसिक स्थिती बिघडली असल्याचे सांगण्यात आले. गेल्या अनेक महिन्यांपासून त्याला नोकरी नसल्याने घरच्यांच्या भीतीपोटी घरापासून दूर राहण्यासाठी त्याने हा गुन्हा केल्याचे रेल्वे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, या आगीत द्वितीय श्रेणीतील एक डबाही जळाला. अग्निशमन दलाच्या दोन गाडय़ांनी ही आग पहाटे साडेचारला आटोक्यात आणली. या प्रकरणी पश्चिम रेल्वे प्रशासनाने एका चौकशी समितीची स्थापना केली आहे. ही समिती महिनाभरात लेखी अहवाल प्रशासनाला देणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने दिली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा