करण जोहर, विधू विनोद चोप्रा, संजय गुप्तासारख्या दिग्दर्शकांना फटका!
टाडा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर गेली पाच-सहा वर्षे कायद्याशी लपंडाव खेळणाऱ्या अभिनेता संजय दत्तने बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला होता. अ‍ॅक्शन हिरो तर तो होताच पण, मुन्नाभाई चित्रपट मालिकेच्या यशानंतर विनोदी अभिनेता म्हणूनही त्याने ओळख निर्माण केली होती. ‘अग्निपथ’च्या रिमेकमधील कांचाची खलनायकी भू्मिका यशस्वी झाल्यानंतर एक चांगला खलनायक आणि चरित्र अभिनेता अशा विविध भूमिकांमध्ये संजयने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. आणि म्हणूनच अगदी संजय गुप्ता, राजकुमार हिरानी या त्याच्या चौकडीतल्या दिग्दर्शकांबरोबरच करण जोहर, अपूर्व लाखियासारख्या दिग्दर्शक-निर्मात्यांीही संजय दत्तला चित्रपटासाठी करारबध्द केले होते. संजय दत्तला चित्रपटांमध्ये मिळत असलेल्या यशामुळे त्याच्यावर असलेल्या आरोपांचा, कायदेशीर शिक्षेचा बॉलिवूडला चांगलाच विसर पडला होता. सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयानंतर एखादी जोरदार थप्पड बसावी आणि झोपेतून जागे व्हावे तशी बॉलिवूडची अवस्था झाली असून त्याला होणाऱ्या साडेतीन वर्षांच्या तुरूंगवासामुळे थोडेथोडके नव्हे तर चित्रपटसृष्टीचे अडीचशे कोटी रूपये आणि नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बिग बजेट चित्रपट रखडणार आहेत.
‘अग्निपथ’ चित्रपटाने संजय दत्तला हात दिला होता. मात्र, यावर्षी त्याचा बहुचर्चित ‘जिला गाझियाबाद’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यानंतर संजय दत्तला पुन्हा यश मिळवून देतील असे चित्रपट आहेत ते म्हणजे संजय गुप्ताचा ‘शुटआऊट अ‍ॅट वडाला’, राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ आणि अपूर्व लाखियाचा ‘जंजीर’. यापैकी संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूट आऊट अ‍ॅट वडाला’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असल्यामुळे त्याचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ला मात्र याचा मोठा फटका बसला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा आमीर खान आणि संजय दत्त एकत्र येणार होते. या चित्रपटाचे पन्नास टक्के चित्रिकरण पूर्ण झाले आहे. उरलेल्या पन्नास टक्क्यांचे काय करायचे हा जसा मोठा प्रश्न विधू विनोद चोप्रासमोर आहे तसाच मुन्नाभाईच्या तिसरा सिक्वल संजय दत्तशिवायच करायचा का?, याचाही निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. ‘मुन्नाभाई चले दिल्ली’ हा तिसरा सिक्वल पहिल्यांदा दिग्दर्शक मिळत नाही म्हणून रखडला होता. अजूनही या चित्रपटासाठी अभिजीत जोशी, सुभाष कपूर आणि राजकुमार हिरानी अशा तीन-तीन दिग्दर्शकांची नावे घेतली जात आहेत. पण, दिग्दर्शकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याआधी मुन्नाभाईलाच चित्रपटातून बाहेर व्हावे लागले आहे, असे चित्र दिसते.
याशिवाय, प्राण यांनी गाजवलेल्या शेरखानची भूमिका ‘जंजीर’च्या रिमेकमध्ये संजय दत्तच्या वाटय़ाला आली होती. याही चित्रपटाचे अर्धेच चित्रिकरण झाले असून मे मध्ये प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘उंगली’ या चित्रपटालाही मोठा फटका बसल्याचे सूत्रांकडून कळते. संजय दत्तला झालेल्या शिक्षेमुळे या वर्षभरात चित्रिकरण पूर्ण होऊन प्रदर्शित होणारे, नुकतेच फ्लोअरवर गेलेले असे ८ ते १० चित्रपट अडकले असून बॉलिवूडचे जवळपास अडीचशे कोटी रूपये अडकले असल्याची माहिती ट्रेड विश्लेषकांनी दिली आहे. संजय दत्तने प्रसिध्दीमाध्यमांना दिलेल्या निवेदनानुसार करार केलेल्या कोणत्याही चित्रपटाचे नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन त्याने दिले असल्याने त्याला न्यायालयाक डून मिळालेल्या चार आठवडय़ांच्या मुदतीत तो कोणते चित्रपट प्राधान्याने पूर्ण करतो, याकडे निर्मात्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. मात्र, सध्या तरी बॉलिवूड अचानक मिळालेल्या या धक्क्यातून सावरलेले नाही, असेच चित्र दिसते आहे.

हम साथ.साथ.है!
संजय दत्त व्यतिरिक्त फरदीन खानला अमलीपदार्थ जवळ बाळगल्याबद्दल मे २००१ मध्ये अटक करण्यात आली होती. अमलीपदार्थ सेवनासाठी त्याने कोकेनची खरेदी केल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली होती. सलमान खानवर ‘हिट अ‍ॅण्ड रन’ आणि काळवीटाची शिकार अशा दोन प्रकरणांबाबत सध्या न्यायालयांमध्ये खटले सुरू आहेत. काळवीट शिकार प्रकरणी सलमानसोबत सोनाली बेंद्रे, तब्बू, नीलम आणि सैफ अली खान हे कलावंतही होते. शायनी आहुजा याला मोलकरणीवर बलात्कार केल्याप्रकरणी शिक्षा झाली असून त्याच्या अपिलावर उच्च न्यायालयापुढे सुनावणी सुरू आहे. सध्या तो जामीनावर सुटला आहे.

संजय दत्तचे रखडलेले चित्रपट
*  पीके                         दिग्दर्शक राजकुमार हिरानी     – ५० टक्के चित्रिकरण पूर्ण
*  जंजीर                     दिग्दर्शक अपूर्व लाखिया       –  चित्रिकरण अपूर्ण
*  अलिबाग                  दिग्दर्शक संजय गुप्ता         – १० ते १५ दिवसांचे चित्रिकरण झाले
*  पोलिसगिरी               निर्माता टी. पी. अगरवाल   – १० ते १५ दिवसांचे चित्रिकरण बाकी
*  शेर                         दिग्दर्शक सोहम शाह         – चित्रिकरण सुरू व्हायचे आहे
*  फ्रीडम २ ऑगस्ट       दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री – चित्रिकरण सुरू व्हायचे आहे
*  फ्रॉड                        दिग्दर्शक अब्बास-मस्तान –   चित्रिकरण सुरू व्हायचे आहे
*  मुन्नाभाई चले दिल्ली    दिग्दर्शक राजकुमार हिरानी  – चित्रिकरण सुरू व्हायचे आहे
*  हम है राही कार मे      दिग्दर्शक जतीन गोयल – चित्रिकरण सुरू व्हायचे आहे
*  सत्ते पे सत्ता रिमेक      स्वत: संजय दत्त – नुसतीच घोषणा
*  पार्टनर २  –              चित्रिकरण सुरू व्हायचे आहे

घटनाक्रम
* १२ मार्च १९९३ : १३ बॉम्बस्फोटांनी मुंबईला हादरविले. २५७ निष्पापांचा मृत्यू, ७१३ जण जखमी.
* १९ एप्रिल १९९३ : अभिनेता संजय दत्तला अटक. खटल्यातील ११७ वा आरोपी म्हणून अटक.
*१४ नोव्हेंबर १९९३ : संजय दत्तसह १८९ आरोपींविरुद्ध दहा हजार पानांचे पहिले आरोपपत्र.
* १९ नोव्हेंबर १९९३ : खटल्याचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडे (सीबीआय) वर्ग.
* १ एप्रिल १९९४ : आरोपींची संख्या लक्षात घेऊन विशेष ‘टाडा’ न्यायालय सत्र न्यायालयातून आर्थर रोड कारागृहात वर्ग.  
* १० एप्रिल १९९५ : २६ आरोपी खटल्यातून दोषमुक्त. सर्वोच्च न्यायालयानेही अबू आझमी यांच्यासह दोघांना दोषमुक्त केले.
* १९ एप्रिल १९९५ : खटल्याला सुरुवात.
* ३० जून १९९५ : खटल्यातील दोन आरोपी माफीचे साक्षीदार बनले.
* १४ ऑक्टोबर १९९५ : १८ महिने आर्थर रोड कारागृहात काढल्यानंतर संजय दत्तला सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन.
* २३ मार्च १९९६ : विशेष ‘टाडा’ न्यायालयाचे न्यायाधीश जे. एन. पटेल यांची उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती.
* २९ मार्च १९९६ : न्यायाधीश प्रमोद कोदे यांची विशेष ‘टाडा’ न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती.
* ऑक्टोबर २००० : सरकारी पक्षाच्या ६८४ साक्षीदारांची साक्ष पूर्ण.
* २० फेब्रुवारी २००३ : दाऊद टोळीचा सदस्य आणि खटल्यातील आरोपी एजाज पठाणला न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
* २० मार्च २००३ :  दाऊद टोळीचा आणखी एक सदस्य मुस्तफा डोसाला अटक आणि सुनावणी स्वतंत्र घेण्याचा न्यायालयाचा नर्णय.
* १३ जून २००६ : अबू सालेमच्या खटल्याची सुनावणी स्वतंत्र करण्याचा निर्णय.
* १२ सप्टेंबर २००६ : निकालाच्या प्रक्रियेला बॉम्बस्फोटांच्या कटाचा मुख्य सूत्रधार टायगर मेमनच्या कुटुंबियांपासून सुरुवात. याकूब मेमनसह मुंबईत विविध ठिकाणी बॉम्ब पेरणाऱ्या १२ आरोपींना फाशीची शिक्षा. मेमन कुटुंबातील तिघांची निर्दोष मुक्तता.
* ४ डिसेंबर २००६ : शेवटच्या आरोपीचा निर्णय.
* १ नोव्हेंबर २०११ : १०० आरोपींनी शिक्षेविरुद्ध केलेल्या अपिलावरील सुनावणीला सर्वोच्च न्यायालयात सुरुवात.
* २१ मार्च २०१३ : सर्वोच्च न्यायालयाकडून याकूब मेमनच्या फाशीवर शिक्कामोर्तब, तर १० जणांची फाशी रद्द करून जन्मठेपेची शिक्षा. जन्मठेप झालेल्या १८ पैकी १६ आरोपींच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब. संजय दत्तलाही पाच वर्षांची शिक्षा.

Story img Loader