करण जोहर, विधू विनोद चोप्रा, संजय गुप्तासारख्या दिग्दर्शकांना फटका!
टाडा न्यायालयाने शिक्षा सुनावल्यानंतर गेली पाच-सहा वर्षे कायद्याशी लपंडाव खेळणाऱ्या अभिनेता संजय दत्तने बॉलिवूडमध्ये चांगलाच जम बसवला होता. अॅक्शन हिरो तर तो होताच पण, मुन्नाभाई चित्रपट मालिकेच्या यशानंतर विनोदी अभिनेता म्हणूनही त्याने ओळख निर्माण केली होती. ‘अग्निपथ’च्या रिमेकमधील कांचाची खलनायकी भू्मिका यशस्वी झाल्यानंतर एक चांगला खलनायक आणि चरित्र अभिनेता अशा विविध भूमिकांमध्ये संजयने आपले वर्चस्व प्रस्थापित केले होते. आणि म्हणूनच अगदी संजय गुप्ता, राजकुमार हिरानी या त्याच्या चौकडीतल्या दिग्दर्शकांबरोबरच करण जोहर, अपूर्व लाखियासारख्या दिग्दर्शक-निर्मात्यांीही संजय दत्तला चित्रपटासाठी करारबध्द केले होते. संजय दत्तला चित्रपटांमध्ये मिळत असलेल्या यशामुळे त्याच्यावर असलेल्या आरोपांचा, कायदेशीर शिक्षेचा बॉलिवूडला चांगलाच विसर पडला होता. सर्वोच्च न्यायालयाने सुनावलेल्या निर्णयानंतर एखादी जोरदार थप्पड बसावी आणि झोपेतून जागे व्हावे तशी बॉलिवूडची अवस्था झाली असून त्याला होणाऱ्या साडेतीन वर्षांच्या तुरूंगवासामुळे थोडेथोडके नव्हे तर चित्रपटसृष्टीचे अडीचशे कोटी रूपये आणि नावाजलेल्या दिग्दर्शकांचे बिग बजेट चित्रपट रखडणार आहेत.
‘अग्निपथ’ चित्रपटाने संजय दत्तला हात दिला होता. मात्र, यावर्षी त्याचा बहुचर्चित ‘जिला गाझियाबाद’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. त्यानंतर संजय दत्तला पुन्हा यश मिळवून देतील असे चित्रपट आहेत ते म्हणजे संजय गुप्ताचा ‘शुटआऊट अॅट वडाला’, राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ आणि अपूर्व लाखियाचा ‘जंजीर’. यापैकी संजय गुप्ता दिग्दर्शित ‘शूट आऊट अॅट वडाला’ चित्रपटाचे चित्रिकरण पूर्ण झाले असल्यामुळे त्याचा प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘पीके’ला मात्र याचा मोठा फटका बसला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदा आमीर खान आणि संजय दत्त एकत्र येणार होते. या चित्रपटाचे पन्नास टक्के चित्रिकरण पूर्ण झाले आहे. उरलेल्या पन्नास टक्क्यांचे काय करायचे हा जसा मोठा प्रश्न विधू विनोद चोप्रासमोर आहे तसाच मुन्नाभाईच्या तिसरा सिक्वल संजय दत्तशिवायच करायचा का?, याचाही निर्णय त्यांना घ्यावा लागणार आहे. ‘मुन्नाभाई चले दिल्ली’ हा तिसरा सिक्वल पहिल्यांदा दिग्दर्शक मिळत नाही म्हणून रखडला होता. अजूनही या चित्रपटासाठी अभिजीत जोशी, सुभाष कपूर आणि राजकुमार हिरानी अशा तीन-तीन दिग्दर्शकांची नावे घेतली जात आहेत. पण, दिग्दर्शकाच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याआधी मुन्नाभाईलाच चित्रपटातून बाहेर व्हावे लागले आहे, असे चित्र दिसते.
याशिवाय, प्राण यांनी गाजवलेल्या शेरखानची भूमिका ‘जंजीर’च्या रिमेकमध्ये संजय दत्तच्या वाटय़ाला आली होती. याही चित्रपटाचे अर्धेच चित्रिकरण झाले असून मे मध्ये प्रदर्शनाची तारीखही निश्चित झाली आहे. करण जोहर दिग्दर्शित ‘उंगली’ या चित्रपटालाही मोठा फटका बसल्याचे सूत्रांकडून कळते. संजय दत्तला झालेल्या शिक्षेमुळे या वर्षभरात चित्रिकरण पूर्ण होऊन प्रदर्शित होणारे, नुकतेच फ्लोअरवर गेलेले असे ८ ते १० चित्रपट अडकले असून बॉलिवूडचे जवळपास अडीचशे कोटी रूपये अडकले असल्याची माहिती ट्रेड विश्लेषकांनी दिली आहे. संजय दत्तने प्रसिध्दीमाध्यमांना दिलेल्या निवेदनानुसार करार केलेल्या कोणत्याही चित्रपटाचे नुकसान होऊ देणार नाही असे आश्वासन त्याने दिले असल्याने त्याला न्यायालयाक डून मिळालेल्या चार आठवडय़ांच्या मुदतीत तो कोणते चित्रपट प्राधान्याने पूर्ण करतो, याकडे निर्मात्यांना लक्ष द्यावे लागणार आहे. मात्र, सध्या तरी बॉलिवूड अचानक मिळालेल्या या धक्क्यातून सावरलेले नाही, असेच चित्र दिसते आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा