मुंबई : परीक्षांचे विस्कळीत वेळापत्रक, प्रवेशपत्र प्राप्त होण्यास लागणारा विलंब, प्रश्नपत्रिकेतील चुका, रखडलेले निकाल व जाहीर झालेल्या निकालांमधील असंख्य त्रुटींमुळे मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना सातत्याने मनःस्ताप सहन करावा लागतो. त्यात प्रामाणिकपणे परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांवरही अन्याय होत असल्याचे उघडकीस आले आहे. गेल्या तीन वर्षांत मुंबई विद्यापीठाच्या विविध परीक्षेदरम्यान २ हजार ६५६ गैरप्रकारांची नोंद झाल्याची धक्कादायक बाब माहितीच्या अधिकारातून उघड झाली आहे. परिणामी, मुंबई विद्यापीठाच्या परीक्षेसंबंधित यंत्रणेबाबतच प्रश्न उपस्थित होत आहेत.

मुंबई विद्यापीठातर्फे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ ते २०२४-२५ या चार वर्षांच्या कालावधीत घेण्यात आलेल्या विविध विद्याशाखांच्या परीक्षेदरम्यान प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे घडलेल्या गैरप्रकारांची सत्र आणि वर्षनिहाय सांख्यिकी माहिती पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ते विहार दुर्वे यांनी माहिती अधिकाराअंतर्गत मागितली होती. त्यानुसार मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या अंतर्गत असणाऱ्या ‘अनफेअर मिन्स एनक्वायरी युनिट’ या विभागाकडून २०२२ ते २०२४ या तीन वर्षात विविध विद्याशाखांच्या परीक्षेदरम्यान घडलेल्या गैरप्रकारांची उन्हाळी व हिवाळी सत्रातील गैरप्रकारांची माहिती उपलब्ध करून देण्यात आली. करोनाकाळामुळे २०२१ वर्षातील माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही. माहितीच्या अधिकारातून उघड झालेल्या धक्कादायक सांख्यिकी माहितीनुसार सर्वाधिक म्हणजे १ हजार २३६ गैरप्रकारांची नोंद ही वाणिज्य शाखेच्या परीक्षेदरम्यान झाली. त्यानंतर विज्ञान शाखेच्या ६०० आणि कला शाखेच्या परीक्षेदरम्यान ३४६ गैरप्रकारांची नोंद झाली. तर सर्वात कमी ९४ गैरप्रकारांची नोंद विधि शाखेच्या परीक्षेदरम्यान झाली आहे.

हेही वाचा : आरोग्य विद्यापीठातर्फे विद्यार्थ्यांसाठी मानसिक आरोग्य हेल्पलाईन!

‘मुंबई विद्यापीठाने परीक्षेसंबंधित विविध गैरप्रकारांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असून संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करून आवश्यक उपाययोजना कराव्यात. बहुसंख्य विद्यार्थी हे अहोरात्र जागून अभ्यास करतात, मात्र काही विद्यार्थी हे चुकीच्या मार्गाचा वापर करून उत्तीर्ण होतात. हा गुणवंत विद्यार्थ्यांवर अन्याय आहे. त्यामुळे गैरप्रकारांकडे लक्ष देऊन नियमाच्या आधारे कारवाई करणे गरजेचे आहे. जेणेकरून परीक्षेसंबंधित प्रक्रिया सुरळीतपणे होऊन मूल्यांकनही व्यवस्थित होईल’, असे मत विहार दुर्वे यांनी व्यक्त केले.

परीक्षेसंबंधित गैरप्रकार म्हणजे काय?

परीक्षेदरम्यान डिजिटल अथवा विविध साहित्यांचा वापर करून कॉपी करणे, परस्पर किंवा समूहाने एकत्र मिळून कॉपी करणे, परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक किंवा संबंधित अधिकाऱ्यांशी विनाकारण हुज्जत घालणे तसेच विनापरवानगी परीक्षा केंद्र सोडून जाणे, इतर परीक्षार्थींशी अनधिकृतपणे संवाद साधणे, रिकाम्या किंवा लिखित उत्तरपत्रिकांची तस्करी आणि त्यावर पर्यवेक्षकांची खोटी स्वाक्षरी करणे, परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका फुटणे, परीक्षेसंबंधित व्यक्तींना लाच देण्याचा प्रयत्न, परीक्षेसंबंधित कामकाज सुरू असणाऱ्या ठिकाणी अनधिकृतपणे प्रवेश व हस्तक्षेप आदी विविध गोष्टींचा परीक्षेसंबंधित गैरप्रकारांमध्ये समावेश होतो.

हेही वाचा : बेस्ट चालकाचे निर्दोषत्व सिद्ध व्हायला तब्बल तेवीस वर्षे, दोषी असल्याचा कोणताही पुरावा नसल्याची उच्च न्यायालयाची टिप्पणी

मुंबई विद्यापीठाकडून प्रत्येक महाविद्यालयामध्ये ‘डिजिटल पेपर डिलिव्हरी सिस्टीम’ची आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून ऑनलाईन प्रश्नपत्रिका महाविद्यालयांना पाठविण्यात येतात. त्यानंतर परीक्षेच्या अर्धा तास आधी संबंधित महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या लॉगिनमध्ये त्यांच्याच उपस्थितीत प्रश्नपत्रिकांची प्रत डाउनलोड केली जाते. प्रश्नपत्रिकेवर वॉटर मार्क आणि परीक्षा केंद्र क्रमांकही नमूद असतो. प्राचार्यांचे ‘फेस रेकग्निशन’, ‘सीसीटीव्ही यंत्रणा’, किती वाजता किती प्रश्नपत्रिकांच्या प्रत डाउनलोड केल्या गेल्या आदी सर्व माहिती विद्यापीठाला प्राप्त होते. तसेच परीक्षेदरम्यान विद्यापीठाचे अधिकारी अचानकपणे परीक्षा केंद्रांना भेट देऊन आढावा घेतात. तसेच परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याने गैरप्रकार (कॉपी) केल्यास परीक्षा केंद्रावरील ‘चीफ कंडक्टर’ हे संबंधित प्रकरण विद्यापीठाला कळवतात. त्यानंतर विद्यापीठातील समितीकडे हे प्रकरण ठेऊन संबंधित विद्यार्थ्याला बोलावून त्याची चौकशी केली जाते. सर्व गोष्टींची शहानिशा करून कारवाईचा निर्णय घेतला जातो. परीक्षेदरम्यान होणाऱ्या गैरप्रकारांकडे मुंबई विद्यापीठाचे गांभीर्याने लक्ष असून पेपरफुटी, कॉपी असे गैरप्रकार रोखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील आहोत.

डॉ. पूजा रौंदळे, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, मुंबई विद्यापीठ