गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी ‘म्हाडा’ने काढलेल्या ६९२५ घरांच्या सोडतीमधील विजेत्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांच्या छाननी प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात २५२ अर्जदार पात्र ठरले असून पात्र अर्जदारांची यादी म्हाडाने जाहीर केली आहे. त्यांना नवीन वर्षांच्या पहिल्याच महिन्यात घराचे पैसे भरण्याबाबतचे देकारपत्र मिळणार आहे.
मुंबईत गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. त्यानुसार गिरण्यांच्या जागेवर उपलब्ध झालेल्या जमिनीवर कामगारांसाठी घरे बांधण्याची जबाबदारी ‘म्हाडा’वर सोपवण्यात आली. सुमारे एक लाख ४७ हजार कामगारांकडून त्यासाठी अर्ज मागवण्यात आले. अर्ज स्वीकारण्याचे काम संपवल्यावर पहिल्या टप्प्यात १८ गिरण्यांच्या जागेवरील ६९२५ तयार घरांसाठी ‘म्हाडा’ने सोडत काढली व त्यात या १८ गिरण्यांमधील सुमारे ४७ हजार कामगारांचा समावेश केला. जूनच्या अखेरीस बऱ्याच वादावादीनंतर ६९२५ घरांसाठी सोडत निघाली आणि विजेते जाहीर झाले.
या विजेत्यांना घर मिळाल्याबाबतचे सूचनापत्र पाठवून त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रे गोळा करण्याचे काम मुंबै बँकेवर सोपवण्यात आले. त्यानुसार मुंबै बँकेकडून पत्र पाठवली. कामगारांनी कागदपत्रे दाखल केली, पण कामगारांच्या पात्रता निकषाचा प्रश्न निर्माण झाल्याने कागदपत्रांची छाननी प्रक्रिया रखडली. त्यामुळे पात्र अर्जदारांची यादी तयार होण्याचे काम रखडले. त्यातून तोडगा काढल्यानंतर छाननी प्रक्रिया पुन्हा सुरू झाली.
आतापर्यंत ६९२५ घरांच्या अर्जदारांपैकी सुमारे २५२ अर्जदारांची छाननी प्रक्रिया अंतिम होऊन पहिली यादी ‘म्हाडा’च्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहे. या पात्रतायादीतील लोकांना आता पैसे भरण्याचे देकार पत्र देणे व नंतर रक्कम भरली की घरांचा ताबा देणे अशी प्रक्रिया आहे.
या पात्र अर्जदारांना नवीन वर्षांची भेट मिळणार असून जानेवारी २०१३ मध्ये त्यांना ‘म्हाडा’तर्फे देकार पत्र पाठवण्यात येतील. त्यामुळे गिरणी कामगारांना घराचा प्रत्यक्ष ताबा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.   

Story img Loader