मुंबई : पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगावदरम्यान सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी शुक्रवारपासून ११ दिवस ब्लॉक घेण्यास सुरुवात झाल्यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील २५६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या. परिणामी, शुक्रवारी दिवसभर बोरिवली, अंधेरी, दादरसह अन्य महत्त्वाच्या स्थानकांवर अभूतपूर्व गर्दी होऊन प्रवाशांचे अतोनात हाल झाले.
फेऱ्या कमी झाल्याने लोकल गाडय़ांमध्ये प्रवाशांची प्रचंड रेटारेटी झाली. गर्दीमुळे गाडीत प्रवेश करणेही शक्य होत नव्हते. स्थानकांवर रखडपट्टी झाल्याने प्रवासी मेटाकुटीला आले.
विरार, वसई, नालासोपारा या भागांतून मुंबईत कामानिमित्त येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. ब्लॉकच्या पहिल्याच दिवशी शुक्रवारी तेथील प्रवाशांचे गाडीत चढता-उतरताना प्रचंड हाल झाले.
हेही वाचा >>> मुंबई लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना, या दोन्ही मार्गांवर रविवारी मेगाब्लॉक; जाणून घ्या वेळापत्रक
पश्चिम रेल्वेवर मुंबई सेंट्रल – बोरिवलीदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम ब्लॉक घेऊन करण्यात येत आहे. ब्लॉक काळात २७ ऑक्टोबरपासून ६ नोव्हेंबपर्यंत ११ दिवसांत २,५२५ लोकल फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. दररोज अप आणि डाऊन मार्गावरील १०० ते ३०० लोकल फेऱ्या रद्द कराव्या लागणार आहेत. शुक्रवार हा ब्लॉकचा पहिला दिवस होता. नेहमीच्या लोकल रद्द झाल्याने आणि उर्वरित लोकलही विलंबाने धावल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल झाले. ब्लॉकमुळे शुक्रवारी डाऊन मार्गावरील १२९, तर अप मार्गावरील १२७ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. एकूण २५६ फेऱ्या रद्द करण्यात आल्यामुळे चर्चगेटपासून विरापर्यंत सर्व रेल्वे स्थानकांवर आणि लोकलमध्येही प्रवाशांची झुंबड उडाल्याचे चित्र होते.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते विरार-डहाणू रोडदरम्यान दररोज १,३८३ लोकल फेऱ्या धावतात. त्यांतून २८ ते ३० लाख प्रवासी प्रवास करतात. सहाव्या मार्गिकेच्या जोडकामाचे मुख्य काम गुरुवारी रात्रीपासून सुरू झाले. या कामाचे पडसाद शुक्रवारी संपूर्ण दिवसभर उमटले. शनिवारीही एकूण २५६ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार असून शनिवारीही शुक्रवारच्या परिस्थितीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून पश्चिम रेल्वेचा ढिसाळ कारभार चालू आहे. लोकलमध्ये बिघाड होणे, त्या विलंबाने धावणे, रद्द करणे असे प्रकार सुरू असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
– मितेश लोटलीकर, प्रवासी
पुढील आठवडय़ात कसोटी
रविवारी अप मार्गावरील ११६ आणि डाऊन मार्गावरील ११४ फेऱ्या रद्द केल्या जाणार आहेत. मात्र, पुढील आठवडय़ात सोमवार ते शुक्रवारी दररोज ३१६ अप आणि डाऊन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. पुढील आठवडय़ात सुमारे एक हजारच फेऱ्या चालवण्यात येणार असल्याने प्रवाशांना धक्काबुक्की करीत प्रवास करावा लागणार आहे.
खबरदारी काय?
फलाट आणि पादचारी पुलांवर एकाचवेळी गर्दी होऊन चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती उद्भवू नये, यासाठी आरपीएफचे ३५९ आणि रेल्वे पोलिसांचे १७८ अधिकारी -कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर साध्या वेशातील सुरक्षा कर्मचारी लक्ष ठेवणार आहेत. वारंवार उद्घोषणा करून प्रवाशांना माहिती देण्याबरोबरच आणि सीसी टीव्ही कॅमेऱ्यांद्वारे गर्दीच्या ठिकाणांवर नजर ठेवली जाणार आहे.