मुंबई : मुंबईतील २६/११ दहशतवादी हल्ल्लाप्रकरणी संशयित आरोपी तहव्वूर हुसैन राणाविरोधात गुन्हे शाखेने ४०५ पानांचे आरोपपत्र सोमवारी विशेष न्यायालयात दाखल केले. हल्ल्याच्या पंधरा दिवसांपूर्वी तहव्वूर राणा स्वत: मुंबईत आला होता. याशिवाय हेडलीने पाठवलेले ईमेल व हेडलीसोबत राणाने केलेला प्रवास याची माहिती गुन्हे शाखेच्या हाती लागली आहे.
मुंबई दहशतवादी हल्ल्याप्रकरणी आरोपपत्र दाखल झालेला राणा हा पाचवा आरोपी आहे. यापूर्वी चार आरोपींविरोधात गुन्हे शाखेने आरोपपत्र दाखल केले होते. याप्रकरणी बेकायदा कृत्य प्रतिबंधक कायद्यांतर्गत (यूएपीए) गुन्हा दाखल असून गुन्हे शाखेने सोमवारी विशेष यूएपीए न्यायालयात राणाविरोधात आरोपपत्र दाखल केले. मुंबई हल्ल्यातील प्रमुख आरोपी डेविड हेडली २००६ ते २००८ या दोन वर्षांमध्ये आठ वेळा मंबईत आला होता. त्यावेळी त्याने हल्ला झालेल्या ठिकाणांची पाहणी केल्याचा आरोप आहे. हल्ल्याच्या पाच दिवस आधी म्हणजे २१ नोव्हेंबरला त्याने मुंबई सोडली. तेथून तो दुबईला गेला. तेथून २४ नोंब्हेबरला त्याने चीनचा प्रवास केला होता.