मुंबई : तरुण मुलाला वैमानिकाचे प्रशिक्षण देण्याचे आमिष दाखवून वडिलांची २६ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना चेंबूर येथे घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.
चेंबूरमधील आरसीएफ परिसरात तक्रारदार वास्तव्यास असून त्यांच्या मुलाला वैमानिकाचे प्रशिक्षण घ्यायचे होते. त्यामुळे त्यांनी याबाबत माहिती मिळविण्यासाठी अनेकांशी संपर्क साधला होता. त्यांच्या मित्राची मुलगी वैमानिक असल्याची माहिती त्यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी तिला घरी बोलावून याबाबत माहिती विचारली असता ओळखीच्या प्रशिक्षण केंद्रात प्रवेश देण्याचे आश्वासन तिने तक्रारदारांना दिले. मित्राची मुलगी असल्याने तिने सांगितल्याप्रमाणे तक्रारदारांनी टप्पाटप्याने तिला २६ लाख रुपये दिले.
हेही वाचा – मुंबईतील ‘या’ विभागात १७ आणि १८ जानेवारीला पाणी नाही; आजच पाण्याचा साठा करावा लागणार
अनेक महिने उलटल्यानंतरही मुलाला प्रशिक्षण केंद्रात प्रवेश न मिळाल्याने त्यांनी मित्राची मुलगी शरदी पै हिच्याकडे विचारपूस केली. मात्र तिने उडवाउडवीची उत्तरे दिल्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे तक्रारदारांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी मंगळवारी आरसीएफ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.