लोकसत्ता प्रतिनिधी
मुंबई : राज्यात नव्याने स्थापन करण्यात आलेल्या व श्रेणीवर्धन केलेल्या आरोग्य संस्थांसाठी नव्याने कुशल व अकुशल पदांची निर्मिती करण्याचा निर्णय सार्वजनिक आरोग्य विभागाने घेतला आहे. त्यानुसार ९३ विविध आरोग्य संस्थांसाठी २६०३ पदे निर्माण करण्यात आली असून, ही पदे बाह्यस्त्रोतांद्वारे भरण्यात येणार आहेत.
राज्यातील आरोग्य व्यवस्था सक्षम करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत असलेली विविध रुग्णालये व आरोग्य संस्था अद्ययावत करण्यात येत आहेत. त्याचबरोबर नव्याने रुग्णालये व संस्था स्थापन करण्यात येत आहेत. त्यानुसार राज्यामध्ये ९३ विविध आरोग्य संस्थांमध्ये मनुष्यबळाची आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेता सार्वजनिक आरोग्य विभागाने रुग्णालये व आरोग्य संस्थांसाठी २,६०३ पदे बाह्यस्त्रोतांद्वारे भरण्याचा निर्णय घेतला आहे. २०२४-२५, २०२५-२६, २०२६-२७ या तीन वर्षांसाठी ही पदे भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. नाशिकमध्ये २५५, नंदूरबारमध्ये ३४, धुळे जिल्ह्यात ७८, जळगाव जिल्ह्यात ८८, अहमदनगर जिल्ह्यात ६४, अकोला जिल्ह्यात ११४, वाशिम जिल्ह्यात ५२, अमरावती जिल्ह्यात १८९, बुलढाणा जिल्ह्यात ६६ पदे, यवतमाळ जिल्ह्यात १३३, नागपूर जिल्ह्यात १९९, वर्धा जिल्ह्यात ६६, चंद्रपूर जिल्ह्यात ९२, गडचिरोली जिल्ह्यात २६, ठाणे जिल्ह्यात २०६, पालघर जिल्ह्यात १८१, रायगड जिल्ह्यात ५, पुणे जिल्ह्यात ९७, सातारा जिल्ह्यात ४५, सोलापूर जिल्ह्यात ५०, कोल्हापूर जिल्ह्यात ९८ पदे, सांगली जिल्ह्यात २३, रत्नागिरी जिल्ह्यात ५२, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६०, जालना जिल्हा ५८, परभणी जिल्ह्यात १३, हिंगोली जिल्ह्यात २४, संभाजी नगर जिल्ह्यात ९५, लातूर जिल्ह्यात १९५, नांदेड जिल्ह्यात २६, धाराशीव जिल्ह्यात ५, बीड जिल्हात ९ पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.