मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील आरोपी डेव्हिड हेडली याला येत्या १० डिसेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चौकशीसाठी हजर करण्याचे आदेश येथील विशेष न्यायालयाने दिले आहेत. हेडली सध्या अमेरिकी कारागृहात ३५ वर्षांचा कारावास भोगत आहे.

मुंबई हल्ल्यातील आरोपी अबू जुंदाल याच्या विरोधातील खटला सध्या विशेष न्यायालयात सुरू आहे. त्याच्यावर अलीकडेच आरोप निश्चित करण्यात आले आहेत. जुंदालबरोबरच डेव्हिड हेडलीलाही याप्रकरणी आरोपी करण्यात यावे, अशी मागणी मुंबई पोलिसांनी केली होती. तसेच जुंदाल व हेडली यांच्यावर एकत्रित खटला चालवण्याचाही पोलिसांचा आग्रह होता. बुधवारी विशेष न्यायालयाचे न्यायाधीश जी. ए. सानप यांनी मुंबई पोलिसांची ही मागणी मान्य करत हेडलीला १० डिसेंबरला व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर करण्याचे आदेश दिले.
२६/११च्या हल्ल्यासाठी हेडलीने मुंबईत पाहणी करून हल्ल्याची ठिकाणे निश्चित केली होती. हल्ल्याच्या कटात जुंदाल आणि हेडली दोघेही सहभागी होते. त्यामुळे जुंदालसोबत हेडलीवरही एकत्रित खटला चालविण्यात आला पाहिजे, असे नमूद करत पोलिसांनी त्याला आरोपी बनविण्याची मागणी केली होती. अमेरिकी न्यायालय भारतीय दंडविधानानुसार त्याच्यावर खटला चालवू शकत नाही, असा दावा करत त्याला येथील खटल्यामध्ये आरोपी बनविण्याची मागणी विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी न्यायालयाकडे केली होती.

Story img Loader