Terrorist Attack by Coastal Way: मुंबईवरील २६/११ च्या सागरी दहशतवादी हल्ल्याच्या वेळेस एक महत्त्वाची बाब लक्षात आली, ती म्हणजे सागरी चाच्यांसोबत दहशतवाद्यांनी केलेली हातमिळवणी. आफ्रिकेच्या किनारपट्टीवर त्याचप्रमाणे इंडोनेशियाजवळच्या मलाक्काच्या सामुद्र्यधुनीमध्ये मोठ्या प्रमाणावर सागरी चाच्यांच्या कारवाया सुरू असतात. यांच्यासोबत दहशतवाद्यांनी हातमिळवणी केली तर सागरी व्यापाराच्या सुरक्षेला मिळालेले ते सर्वात मोठे जागतिक आव्हान असणार याची जगभरातील नौदलांना खात्रीच होती. अशी हातमिळवणी झाल्याची शंकाही होतीच. २६/११ च्या हल्ल्यासाठी जी ‘मोडस ऑपरेंडी’ दहशतवाद्यांनी वापरली त्यातून हे पुरते स्पष्ट झाले की, त्याचे प्रशिक्षण त्यांनी सागरी चाच्यांकडून तरी घेतले आहे किंवा मग हातमिळवणी तरी केली आहे!
सागरी चाच्यांच्या अधुनिकतेची जोड दहशतवाद्यांना मिळाली तर…
१९९९ साली झालेल्या अलोन्ड्रा रेनबो प्रकरणामध्ये सागरी चाच्यांनी त्यांच्या ‘मोडस ऑपरेंडी’मध्ये आणलेली आधुनिकता पुरती लक्षात आली होती. पनामाचे व्यापारी जहाज, जपानी मालक असलेल्या या प्रकरणात त्या जहाजावरील सर्व कर्मचाऱ्यांची हत्या करून चाच्यांनी संपूर्ण जहाज ताब्यात घेतले. ते पूर्णपणे नव्याने रंगवले आणि नवीन नावाने ते वापरण्यास सुरुवातही केली. हे करत असताना आंतरराष्ट्रीय नौवहन सोपे व्हावे यासाठी अशाप्रकारे बनावट कागदपत्रे तयार केली की, ती १०० टक्के खरीच वाटावीत. भारतीय तटरक्षक दलाने कारवाई करून हे जहाज ताब्यात घेतले तेव्हा जगभरातील नौदलांसाठी तो मोठाच धडा होता. त्याच वेळेस जगभरातील गुप्तचर यंत्रणांना ही शंकाही आली होती की, सागरी चाच्यांच्या या आधुनिकतेची जोड दहशतवाद्यांना मिळाली तर जगासाठी परिणाम भीषण असतील. कारण त्यांनी जहाजाच्या रजिस्ट्रेशनपासूनचे सर्व कागदपत्रे कायदेशीर प्रक्रियेचा वापर करून नव्याने तयार केले होते. ज्यामध्ये बनावटपणाचा मागमूसही लागू दिला नव्हता.
26/11 Mumbai Terror Attack: मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर नेमकं काय बदललं? आपण काय धडा घेतला?
तेव्हाच पूर्ण बोट तपासली असती तर…
२६/११ च्या हल्ल्यासाठीही दहशतवाद्यांनी अशाच प्रकारची कागदपत्रे तयार केली होती. दहशतवाद्यांची ओळखपत्रेही तयार केलेली होती. याच बनावट कागदपत्रांसह त्यांनी भारतीय सागरी हद्दीमध्ये प्रवेश केला. ‘कुबेर’ ही छोटेखानी बोट ताब्यात घेतली. तटरक्षक दलाने त्यांना तपासणीसाठी अडवलेही. मात्र त्यांनी बेमालूम खरी वाटावीत अशी कागदपत्रे दाखवली आणि कागदपत्रे पाहून, त्यांची छाननी करून तटरक्षक दलाने त्यांना जावू दिले… आणि नंतरचा दहशतवादी हल्ला हा इतिहास झाला. खरेतर तटरक्षक दलाच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण बोटीची तपासणी केली असती तर तिथेच त्यांना रोखता आले असते. कारण हल्ल्याची सर्व सामग्री आतमध्येच दडवून ठेवण्यात आली होती.
देशाच्या सागरीसुरक्षेसाठी पुढील ३६ तास महत्वाचे; जाणून घ्या ‘ऑपरेशन सी व्हिजिल’!
यामध्ये दोषारोप तटरक्षक दलावर झालेला असला तरी प्रत्यक्ष खोल समुद्रातील तपासणी ही आपल्याला वाटते तेवढी सोपी नसते. रस्त्यावर गाडी बाजूला घेऊन तपासणी करण्यास सांगणे आणि खोल समुद्रात बोटीची तपासणी करणे यात जमीन अस्मानाचे अंतर आहे. अर्थात, या हल्ल्यानंतर आता तटरक्षक दलाने त्यांच्या एसओपीजमध्ये (स्टॅण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर) महत्त्वपूर्ण असा बदल केला आहे. कोणतीही गोष्ट गृहीत न धरता काटेकोर तपासणी हेच आता भविष्यातील असे हल्ले टाळण्यासाठीचे गमक असेल!