मुंबई: २६/११ ला मुंबई हल्ल्याला १५ वर्ष पूर्ण होत असताना मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून मानखुर्द परिसरात दोन दहशतवादी पाहिल्याचा दूरध्वनी आला होता. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या. गुन्हे शाखेसह स्थानिक मानखुर्द पोलिसांनी परिसरात शोध घेतला असता दूरध्वनीमध्ये देण्यात आलेली माहिती खोटी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
मुख्य पोलीस नियंत्रण कक्षास रविवारी एक दूरध्वनी आला होता. त्यात ” दोन ते तीन दहशतवादी आले होते. त्यांची भाषा मला समजत नाही. ते काहीतरी कट रचत आहेत. त्यांच्याकडे बॅग आहे. त्यांनी दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीला शौचालयाचा रस्ता विचारला.” असे सांगितले.
दूरध्वनीनंतर मुख्य नियंत्रण कक्षाने याबाबतची माहिती गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांना दिली. त्यानुसार एकता नगर येथे संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलीस पोहोचले. पण तेथे कोणीच संशयित दहशतवादी सापडले नाहीत. त्यामुळे दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीचा शोध घेतला असता त्याचा मोबाईल बंद असल्याचे आढळले. अखेर तो दूरध्वनी किशोर लक्ष्मण ननावरे यांचा असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलीस त्यांच्या घरी पोहोचले.
हेही वाचा… पुढील तीन ते चार तासांत मुंबईत पावसाचा अंदाज
दूरध्वनी करणारी व्यक्ती दारूच्या अंमलाखाली होती, असे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले. तो विजय बार येथून दारू पिऊन घरी जात असताना, एका व्यक्तीने त्याचा मोबाईल दूरध्वनी मागितला, त्या व्यक्तीने कोणाला दूरध्वनी केला याची माहिती नसल्याचे किशोर यांनी सांगितले. ननावरेच्या बोलण्यात तथ्य आहे किंवा नाही, याबाबत सीसीटीव्ही चित्रीकरणच्या मदतीने पोलीस तपास करत आहेत. संशयित दहशतवादी दिसल्याची माहिती खोटी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे.
गेल्या वर्षभरात मुंबई पोलिसांना धमकी व खोटी माहिती देणारे किमान शंभरहून अधिक संदेश अथवा दूरध्वनी प्राप्त झाले आहेत. याबाबत अधिकाऱ्याने सांगितले की, अशा प्रकरणांकडे कानाडोळाही करता येत नाही. त्यामुळे सर्व प्रकरणांची तपासणी करण्यात येते. त्यासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लागते. खूप प्रयत्न करूनही धमकी अथवा संदेश पाठवणाऱ्या व्यक्तीला अटकही होते. अशा प्रकरणांसाठी विशेष कायदा नाही. परिणामी, अशा प्रकरणांमध्ये आरोपीला लवकर जामीन मिळतो. त्यामुळे याप्रकरणासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.