मुंबईवरील २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात आपल्या पतीला गमावलेल्या ३५ महिलांपैकी २२ महिला क्लेशदायक व १८ महिला आर्थिक विवंचनेत आपले जीवन जगत आहेत. गेली चार वर्षे अभ्यास करून टाटा सामाजिक विज्ञान संस्थेने (टीआयएसएस) ही बाब समोर आणली.
या अभ्यासात मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील विधवांच्या परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या अभ्यासातून अत्यंत धक्कादायकबाबी समोर आल्या आहेत. ब-याचजणींना आपल्या पतीच्या मृत्यूनंतर सासर बळजबरीने सोडण्यास भाग पाडण्यात आले. काहीजणींवर संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी पडली असून, अतिकष्टाने त्या खचून गेल्या आहेत. पुरूषप्रधान समाजाचा फटका त्यांना बसला आहे. कोत्याही प्रकारचे आर्थिक स्वातंत्र्य त्यांना नाही. त्यांच्या आरोग्याकडे आणि जगण्याकडे कोणाचेही लक्ष नाही.
हा अभ्यास तीन गटांमध्ये विभागला होता. त्यात अद्याप मुले शाळेत जात नसणा-या तरुण विधवा (१६), मुळे शाळेत जाणाऱया विधवा (१४) व ज्यांची मुले मोठी झाली आहेत, अशा वयस्कर विधवा (५), असे गट पाडण्यात आले. या विधवांच्या आरोग्याची मोठी समस्या आहे. पस्तीसपैकी सोळाजणींचे आरोग्य हालाखीचे आहे. सुरूवातीच्या काळात या महिलांनी खंबीरपणे या संकटाचा सामना केला होता. मात्र, जसजसे दिवस सरले, तसतसे चार वर्षानंतर त्यांना पुरुषप्रधान व्यवस्थेची झळ बसू लागली.
“महाराष्ट्रातील सतरा, उत्तर प्रदेशातील आठ, बिहारमधील सात आणि झारखंड, केरळची प्रत्येकी एक अशा विधवांचा अभ्यास करण्यात आला. यातील तरुण विधवांचे जास्त शोषण होत असल्याचे हा अभ्यास म्हणतो. अकरा विधवांचे पती पगारदार नोकर होते. चौदा स्थलांतरित कुटुंबे होती, काही विधवा आजही मुंबईत राहात आहेत. दहा स्थलांतरित कामगारांच्या गावाकडे थोडी शेती आहे.” अशी माहिती टाटा सामाजिक विज्ञान संस्थेच्या जॅक्लीन जोसेफ यांनी दिली.
दहशतवादी हल्ल्यापूर्वी कोणत्याही प्रकारचे काम न करणा-या ३२ पैकी पंधरा विधवांना सरकारने काम देऊ केले आहे. आठ जणींवर मुलांना सांभाळण्याची जबाबदारी आहे. काही जणींच्या सासरकडील मंडळींनी मुलांना त्यांच्याकडे ठेवून घेतले आहे.
शासनाकडून आर्थिक नुकसान भरपाई मिळूनदेखील सतरा विधवा आर्थिक विवंचनेत आहेत. सहाजणी त्यांच्या सासरकडील कुटूंबांवर अवलंबून आहेत.
“ब-याचजणींना शासनाकडून मिळालेली रक्कम सासरकडील लोकांनी अधिकार नसताना काढून घेतली. त्या पैशांचा उपयोग त्यांनी व्यवसायासाठी, घरबांधणीसाठी केला. त्या विधवांना त्यांच्या गावांमध्ये श्रीमंत समजले जात आहे. मात्र, वास्तवात त्यांना या नुकसान भरपाईत मिळालेल्या पैशांचा गंधदेखील नाही. आता ब-याचजणी रेल्वेकडे परत नोकरीसाठी प्रतिज्ञापत्र सादर करत आहेत.” असे जोसेफ म्हणाल्या.

Story img Loader