मुंबई उपनगरीय रेल्वे प्रवाशांना झटपट तिकीट देण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने मुंबई विभागाच्या स्थानकातील एटीव्हीएमची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही मार्गांवरील स्थानकात आणखी २६३ नवीन एटीव्हीएम बसविण्यात येणार आहेत.
मध्य रेल्वे उपनगरीय स्थानकात ४७६ आणि पश्चिम रेल्वेवर ३४३ एटीव्हीएम मशिन आहेत. एटीव्हीएम, तिकीट खिडक्या, जनसाधारण तिकीट आरक्षण सुविधा, मोबाईल तिकीट यामध्ये एटीव्हीएममधून काढल्या जाणाऱ्या तिकीटांचे प्रमाण मध्य रेल्वेवर २८ टक्क्यांपेक्षाही जास्त आहे. तर पश्चिम उपनगरीय स्थानकात हे प्रमाण त्याहून अधिक आहे.
टाळेबंदीपूर्वी एटीव्हीएममधून रोज लाखांहून अधिक तिकीटे काढली जात होती. टाळेबंदी सुरू होताच तिकीट खिडक्यांव्यतिरिक्त एटीव्हीएमसह अन्य तिकीट सुविधा बंदच ठेवण्यात आल्या. पहिल्या, दुसऱ्या व तिसऱ्या लाटेवेळी निर्बंध लागू झाले, तशा या सुविधा बंदच करण्यात आल्या होत्या. निर्बंध शिथिल झाल्याने व प्रवासी संख्याही वाढल्याने एटीव्हीएम पुन्हा सुरु करण्याचा निर्णय झाला आहे. तिकीट खिडक्यांबरोबरच एटीव्हीएमसमोरही तिकीट काढण्यासाठी प्रवाशांच्या रांगा असतात. प्रवाशांचा तिकीट काढण्याचा वेळ आणखी कमी करण्यासाठी एटीव्हीएमची संख्या वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार सध्या ३६ उपनगरीय स्थानकात असलेल्या एटीव्हीएममधून प्रतिदिन ९९ हजार ९१ तिकीटे काढली जातात. चर्चगेट ते डहाणूपर्यंत या एटीव्हीएमची संख्या वाढवण्याचा प्रस्ताव आहेत. यामध्ये 113 नवीन एटीव्हीएम बसविण्यात येणार असून पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापक कार्यालयात प्रस्ताव मंजुरीसाठी असल्याची माहिती देण्यात आली. लवकरच यावर अंतिम निर्णय होऊन एटीव्हीएम टप्प्याटप्प्यात बसविले जातील.
मध्य रेल्वे मार्गावरील ८० उपनगरीय स्थानकात एटीव्हीएम असून सध्या दररोज ४७ हजार तिकीट काढली जातात. आता आणखी १५० नवीन एटीव्हीएम बसविली जाणार आहेत. यात मध्य रेल्वेवरील सीएसएमटी ते कर्जत, कसारा, हार्बरवर सीएसएमटी ते पनवेल, ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बर आणि बेलापूर उरण मार्गावरील काही स्थानके आहेत.