शाळा सुरू होताच पहिल्याच दिवशी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांना २७ शालोपयोगी वस्तू देण्यात येणार असून माटुंगा येथील सिटी ऑफ लॉस एंजलीस महापालिका शाळेत शालोपयोगी वस्तू वाटपाच्या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचबरोबर राज्य सरकारच्या आदेशानुसार पालिकेच्या शाळांमध्ये ‘प्रवेशोत्सवा’ होणार आहे.
सोमवारी शाळा सुरू होत असून या दिवशी सकाळी ११ वाजता माटुंगा येथील सिटी ऑफ लॉस एंजलीस महापालिका शाळेत विद्यार्थ्यांना शालोपयोगी वस्तूंच्या वितरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. महापौर सुनील प्रभू यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना या वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालिका शाळांमध्ये पहिल्या दिवशी ‘प्रवेशोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे.