मुंबईः गोरेगाव पूर्व येथे २७ वर्षीय तरूणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याचा प्रकार शनिवारी घडला. याप्रकरणी वनराई पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी २१ वर्षीय तरूणाला अटक केली. हत्येत वापरण्यात आलेल्या चाकू अद्याप पोलिसांच्या हाती लागला नसून त्याचा शोध सुरू असल्याचो पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा >>> मुंबई युवा अध्यक्ष परमेश्वर रणशूर यांच्यावर हल्ला, चोख प्रत्युत्तर देणार असल्याचा वंचितचा इशारा
राजू साहेबु सुरंजे (२७) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्याच्या छातीत, गळ्यात व पोटात चाकूने वार करण्यात आले आहे. त्याला जखमी अवस्थेत शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सुरूवातीला भादंवि कलम ३२३, ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. राजू याच्या मृत्यूनंतर पोलिसांनी याप्रकरणी भादंवि कलम ३०२ (हत्या) वाढवण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. मृत राजू हा गोरेगाव पूर्व येथील कामा इस्टेट परिसरातील रहिवासी आहे. त्यांची परिसरातील राणी मिश्रा व तिची आई यांच्यासोबत वाद झाला होता. त्यातून शनिवारी वाद सुरू असताना आरोप आदित्य अविनाश नलावडे (२१) याने चाकूने राजूच्या गळ्यावर, छातीवर व पोटात वार केले. त्यात राजू गंभीर जखमी झाला होता. पुढे उपचारादरम्यान राजूचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आदित्यला याप्रकरणी अटक केली. आदित्य कामा इस्टेट परिसरातील रहिवासी आहे. तो गॅरेजमध्ये काम करतो, अशी माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी वनराई पोलीस अधिक तपास करत आहेत.