मुंबई : मुंबईतील अठरा वर्षांवरील अपंग व्यक्तींसाठी महापालिकेच्या वतीने सुरू केलेल्या आनंद दिघे दिव्यांग अर्थसाहाय्य योजनेअंतर्गत आतापर्यंत २७०० अपंगांना अर्थसाहाय्य मंजूर केले आहे. एप्रिल २०२४ पासून सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत आतापर्यंत पालिकेकडे ४२४५ अर्ज आले आहेत. केंद्र सरकारतर्फे दिले जाणारे यूडीआयडी कार्ड असलेल्या अपंगांना अपंगत्वाच्या टक्केवारीनुसार सहा हजार ते १८ हजार रुपये अर्थसाहाय्य दिले जात आहे.
मुंबईतील अठरा वर्षांवरील अपंग व्यक्तींना अर्थसाहाय्य देण्याची घोषणा महापालिका प्रशासनाने चालू अर्थसंकल्पात केली. माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतील ही योजना एप्रिल २०२४ पासून सुरू झाली आहे. पालिकेच्या नियोजन विभागातर्फे या योजनेची अंमलबजावणी केली जात आहे.
केंद्र सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या वैश्विक ओळखपत्रधारकांना (यूडीआयडी) सहामाही अर्थसाहाय्य दिले जाणार आहे. अपंगत्वाची टक्केवारी ४० ते ८० टक्के असलेल्यांना पिवळे कार्ड दिले जाते तर ८० टक्केपेक्षा जास्त अपंगत्व असलेल्यांना निळे कार्ड दिले जाते. त्यानुसार पिवळे कार्डधारक अपंगांना सहामाही सहा हजार रुपये दिले जाणार आहेत. तर निळे कार्डधारकांना सहामाही १८ हजार रुपये दिले जाणार आहेत. यूडीआयडी कार्डधारकांनाच या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे.
६० हजार यूडीआयडी कार्डधारक
सध्या मुंबईत यूडीआयडी कार्डधारक असलेले सुमारे ६० हजार अपंग आहेत. ज्यांच्याकडे आता यूडीआयडी कार्ड नाही, त्यांनी या कार्डसाठी अर्ज केल्यानंतर व त्यांना केंद्र सरकारचे कार्ड मिळाल्यानंतर त्यांनाही या योजनेत समाविष्ट केले जाणार आहे. यूडीआयडी कार्ड मिळवण्यासाठी पालिकेच्या कूपर आणि केईएम रुग्णालयात आधीच सुविधा उपलब्ध आहेत.
व्याप्ती वाढणार
या योजनेअंतर्गत सातत्याने अर्ज येत असून त्याची दररोज प्रक्रिया सुरू असते. अर्ज मंजूर झाले की ते पुढील प्रक्रियेसाठी लेखा विभागाकडे मंजुरीसाठी पाठवले जातात. लेखा विभागाने मंजुरी दिल्यानंतर खात्यात थेट रक्कम जमा होते. त्यामुळे अपंगांची संख्या जशी वाढेल, तशी या योजनेची व्याप्ती वाढणार असल्याची माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली. चालू आर्थिक वर्ष संपेपर्यंत पाच हजार अर्ज प्राप्त होतील, अशी शक्यता आहे. त्यानुसार पुढील आर्थिक वर्षाच्या तरतुदीत १० टक्के वाढ केली असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली.