मुंबई : पश्चिम रेल्वेवरील मुंबई सेंट्रल ते बोरिवलीदरम्यान सहावी मार्गिका प्रकल्प अनेक वर्षांपासून रखडला आहे. या सहाव्या मार्गिकेच्या कामासाठी २९ दिवसांचा मोठा ब्लॉक घेण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपासून हा ब्लॉक सुरू झाला असून पुढील २९ दिवस पायाभूत कामे केली जाणार आहेत. खार ते गोरेगावर दरम्यान ८.८ किमी रुळजोडणीची व इतर कामेही सुरू करण्यात आली आहेत. परिणामी पश्चिम रेल्वेवरील सुमारे २,७०० लोकल फेऱ्या रद्द होणार असून ४०० लोकल फेऱ्या अंशत: रद्द होतील. त्यामुळे पुढील एक महिना प्रवाशांना लोकल प्रवास करताना मनस्ताप होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा >>> मराठा आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका; उपोषण करणाऱ्यांना राज्य सरकार कशाच्या आधारे आश्वासन देते?
पश्चिम रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वेवरील खार ते गोरेगाव दरम्यान सहाव्या मार्गाचे बांधकाम सुरू करण्यासाठी २९ दिवसांचा ब्लॉक घेतला आहे. हे काम अत्यंत गुंतागुंतीचे असूनही रेल्वे सेवेत कमीत कमी व्यत्यय आणि प्रवाशांची जादा गैरसोय होऊ नये, यासाठी ब्लॉक घेण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपासून पुढील १० ते १३ दिवसांत मोजक्याच लोकल रद्द होतील असे नियोजन आहे. तर, २० ऑक्टोबरपासून सुमारे २,७०० लोकल रद्द होणार आहेत. सुमारे ४०० लोकल सेवा अंशत: रद्द होतील. लांब पल्ल्यांच्या सर्वच रेल्वेगाडय़ांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार असून ६० रेल्वेगाडय़ा रद्द आणि सुमारे २०० रेल्वेगाडय़ा अंशत: रद्द होतील.
हेही वाचा >>> सेक्सटॉर्शनला कंटाळून रेल्वे कर्मचाऱ्याची आत्महत्या
१९ ऑक्टोबरपासून अंधेरी रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक ९ वरील रेल्वे वाहतूक बंद असेल. तसेच कामाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९ वाजेपासून ते रविवारी रात्री ९ वाजेपर्यंत रेल्वे रूळ काढण्यासाठी आणि जोडण्यासाठी वांद्रे टर्मिनस दरम्यान २४ तासांचा ब्लॉक घेण्यात येईल. दरम्यान, ब्लॉकचे काम रात्री ११.३० ते पहाटे ४.३० वाजेपर्यंत आणि काहीवेळा दिवसाही केले जाईल. या कामामुळे पश्चिम रेल्वेवरील लोकल सेवेवर परिणाम होणार असून दरदिवशी १५० ते २५० लोकल सेवा रद्द होण्याची शक्यता आहे, असे पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.