मुंबई : मुंबईत चांगला पाऊस पडला असला तरी यावर्षी पावसाच्या चार महिन्यांमध्ये दुर्घटना घडण्याचे प्रमाण कमी आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावेळी जखमींची व मृतांची संख्या कमी असली तरी पावसाच्या चार महिन्यात विविध दुर्घटनांमध्ये १०२ जण जखमी झाले आहेत तर २८ जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. मुंबईत थोडासा पाऊस पडला की रस्त्यावर पाणी साचते, नाले दुथडी भरून वाहू लागतात, कुठे इमारतींची पडझड होते, झाडे किंवा फांद्या कोसळतात. अशा विविध दुर्घटना घडतात. पालिकेच्या आपत्कालीन विभागाकडे या घटनांची नोंद होत असते.
हेही वाचा >>> महाविकास आघाडीने केवळ ‘वसुली सरकार’ म्हणून काम केले ; महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचा आरोप
यंदा पाऊस खूप पडला तरी पाणी तुंबण्याच्या घटनाही कमी घडल्या. तसेच दुर्घटनांचे प्रमाणही कमी झाले आहे. इमारती पडणे, दरड कोसळणे, फांद्या पडणे, वीजेचा धक्का अशा विविध घटनांच्या १६१५ तक्रारी यावेळी चार महिन्यात पालिकेकडे आल्या. या दुर्घटनांमध्ये १०२ जण जखमी झाले तर २८ जण मृत्यूमुखी पडले आहेत. त्यापैकी इमारत किंवा घर पडण्याच्या दुर्घटनांमध्ये सर्वाधिक म्हणजेच २५ मृत्यू झाले आहेत.
१३१० तक्रारी : झाडे व फांद्या पडल्याच्या १३१० तक्रारींची नोंद झाली. गेल्यावर्षी ९२१ तक्रारी होत्या. यंदा या दुर्घटनेत एकाही मृत्यूची नोंद नाही. झाडांच्या फांद्या छाटणीसाठी पालिका दरवर्षी कोटय़वधी रुपये खर्च करीत असते. तसेच खासगी जमिनींवरील झाडांच्या छाटणीसाठी सोसायटय़ांना आवाहन करीत असते. मात्र तरीही यंदा फांद्या पडण्याच्या दुर्घटनांमध्ये वाढ झाली आहे.