एअर इंडियात नोकरी लावतो असे सांगून तब्बल ५७ लोकांना एकूण २८ लाखांचा गंडा घालणाऱ्या एका भामटय़ाला पोलिसांनी सोमवारी अटक केली. विशेष म्हणजे या भामटय़ाने संबंधित व्यक्तींना बनावट नेमणूक पत्रे, नोकरी निमित्त पैसे मिळाल्याचा बाँड तसेच शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कंपनीची नेमणूक पत्रे दिली होती. या भामटय़ासह त्याच्या एका साथीदारालाही गजाआड करण्यात पोलिसांना यश आले.
आपण स्वत: एअरपोर्ट अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाच्या कार्गो विभागात किंवा एअर इंडिया येथे कार्यरत असून तुम्हाला एअर इंडिया कंपनीत नोकरी लावतो, असे आमिष विजय नाईक उर्फ विनय नायक याने मिलिंद भुर्के यांना दाखवले. त्यानुसार मिलिंद भुर्के यांनी, त्यांची बहीण प्रज्ञा आणि नातेवाईक सतीश शिरोडकर व मकरंद मालणकर या सर्वानी मिळून एकूण २ लाख ९५ हजार रुपये या भामटय़ाला दिले. त्यानंतर या भामटय़ाने एअर इंडिया कंपनीत कामाच्या नेमणुकीची पत्रे व नोकरीनिमित्त पैसे मिळाल्याचे बाँड पेपरवर लिहून दिले. मात्र भुर्के यांनी या नेमणूक पत्रांची खातरजमा केली असता ती बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार केली.
तपासादरम्यान एक व्यक्ती एअर इंडियामध्ये नोकरी लावण्याबाबत नेमणुकीचे पत्र देणार असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने सापळा लावत विजय रामकृष्ण खानोलकर उर्फ विजय नाईक उर्फ विनय नायक या ५७ वर्षीय व्यक्तीला अटक केली. याने मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे येथील तब्बल ५७ गरजू आणि बेरोजगार व्यक्तींना नोकरी लावण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून २८ लाखांपेक्षा जास्त पैसे लुबाडल्याचे चौकशीत समोर आले आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक मिलिंद खेतले यांनी दिली. विजय नाईक याला मदत करणाऱ्या मोहमद शादाब अजफर हमीद खान उर्फ रिझवान या युवकाला माहीम येथून अटक करण्यात आली.     

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा