मुंबईः पतीची हत्या केल्याप्रकरणी गोरगाव येथील २८ वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. तिने आपला प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीची हत्या केली. प्रेमसंबंधात पती अडसर ठरत असल्यामुळे त्याचा काटा काढण्यात आला. याप्रकरणी दिंडोशी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

याप्रकरणी दिडोशी पोलिसांनी भारतीय न्याय सहिता कलम १०३ (१), ६१ (२) अंतर्गत गुन्हा दाखल केला असून आरोपी महिलेसह तिच्या साथीदारालाही पोलिसांनी अटक केली. आरोपी प्रियकर आणि त्याचा दुसरा मित्र फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटना कशी घडली ?

दिंडोशी पोलिसांच्या माहितीनुसार, रंजू चौहान (२९, बंजारीपाडा, गोरेगाव पूर्व) हिने तिचा पती चंद्रशेखर चौहान (३५) याची हत्या करण्यासाठी आपल्या प्रियकरासोबत कट रचला. चौहान फिल्म सेटवर कामगार म्हणून काम करत होता. चंद्रशेखर चौहान शनिवारी सकाळी घरी बेशुद्ध अवस्थेत आढळला. त्याला तातडीने ट्रॉमा केअर रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. प्राथमिक शवविच्छेदन अहवाल उपलब्ध नसल्याने, पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली.

महिलेच्या बोलण्यात विसंगती

पती रात्री ठणठणीत होता. नेहमीप्रमाणे तो रात्री झोपला, सकाळी बराच वेळ चंद्रशेखर झोपेतून उठला नाही, तसेच तो कोणताही प्रतिसाद देत नव्हता, अशी माहिती रंजू चौहान हिने पोलिसांना दिली. मात्र, पोलिसांना तिची माहिती संशयास्पद वाटली आणि त्यांनी चौकशी सुरूच ठेवली. महिलेच्या मोबाइल कॉल रेकॉर्ड्समुळे पोलिसांना मोठा सुगावा दिला. आपण रात्री १.३० वाजता झोपलो होतो, असे रंजूने पोलिसांना सांगितले. मात्र तिच्या मोबाईलवर रात्री १.३० नंतर दूरध्वनी आले होते. त्यांची तपासणी केली असता ती दोन व्यक्तींच्या वारंवात संपर्कात असल्याचे निष्पन्न झाले.

चौकशीत गुन्ह्याची कबुली

या तपासाच्या आधारे पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतले आणि तिची चौकशी केली असता तिने गुन्ह्याची कबुली दिली. तिने प्रियकर आणि त्याच्या दोन मित्रांच्या मदतीने पतीला गळा दाबून ठार मारल्याचे सांगितले. गुन्ह्याच्या वेळी आरोपी महिला घटनास्थळी उपस्थित होती. तिने हत्या करण्याआधी काही काठ्या आणि अन्य साहित्य गोळा केले होते. गळा दाबताना प्रतिकार केलाच तर पतीला काठी व इतर साहित्याने मारण्याचा कट होता.

फक्त ६ तासांत गुन्हा उघडकीस

उपायुक्त (परिमंडळ-१२) स्मिता पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजय अफळे यांच्या पथकाने केवळ ६ तासांत या गुन्ह्याची उकल केली. रंजू चौहान आणि तिचा एक साथीदार मोइनुद्दीन लतीफ खानला (२०) हत्या आणि कट रचल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली. याप्रकरणी आरोपी प्रियकर शाहरूख व मित्र शिवदास यांचा शोध सुरू आहे. त्यासाठी तीन पथके तयार करण्यात आली आहेत.

Story img Loader