मालाड परिसरातून दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या २८ वर्षीय महिलेला १२ तासांत अटक करण्यात मालवणी पोलिसांना यश आले आहे. आरोपी महिलेच्या ताब्यातून मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली असून आरोपी महिलेने मुलाचे अपहरण का केले याबाबत पोलीस तपास करत आहेत.
हेही वाचा >>> मुंबई: पेव्हर ब्लॉक डोक्यात मारून एकाची हत्या
मालवणी परिसरात राहणाऱ्या कविता वडार यांची नऊ वर्षांची मुलगी व दीड वर्षाचा मुलगा गावदेवी मंदिर परिसरात खेळत होते. त्यावेळी २५ वर्षीय आरोपी महिला तेथे आली व तिने मुलीला २०० रुपये देऊन दुकानातून बिस्किट आमण्यासाठी पाठवले. ती गेल्यानंतर आरोपी महिलेने दीड वर्षाच्या मुलाचे अपहरण केले. याप्रकरणी तक्रार केल्यानंतर पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला.
हेही वाचा >>> व्हेल माशाच्या उलटीप्रकरणी उच्चशिक्षीत तरूणासह दोघांना अटक
गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस उप आयुक्त (परिमंडळ ११) अजयकुमार बंसल यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक चिमाजी आढाव यांना तात्काळ तपास करण्याबाबत सूचना केल्या. परिमंडळातील विविध पोलिसांचे पथक तयार करण्यात आले. गुन्ह्याच्या तपासात कोणतीही ठोस माहिती नसताना तपास पथकाने तांत्रिक तपास करून आरोपी महिला सोनम मंतोश साहू हिला १२ तासांत ताब्यात घेतले. तिच्या ताब्यातील दीड वर्षाच्या मुलाची सुखरुप सुटका करण्यात आली असून महिला आरोपी अद्याप उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे पोलिसांनी सांगितले.