मुंबईतील वांद्रे-वरळी सागरी सेतूवरून उडी मारून एका २८ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संबंधित तरुण एका खासगी बँकेत नोकरी करत होता. घटनेच्या दिवशी तो टॅक्सीने कार्यालयातून घरी जात होता. यावेळी त्याने वांद्रे-वरळी सी लिंकवरून जात असताना टॅक्सी थांबवली आणि पुलावरून थेट समुद्रात उडी मारली. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून घटनेचा पुढील तपास केला जात आहे.
‘एनडीटीव्ही’ने दिलेल्या वृत्तानुसार, आकाश सिंग असं आत्महत्या केलेल्या २८ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तो मुंबईच्या परळ परिसरातील रहिवासी असून एका खासगी बँकेत नोकरीला आहे. शुक्रवारी रात्री आकाशने वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्सहून परळला जाण्यासाठी टॅक्सी बूक केली. यानंतर त्याने चालकाला वांद्रे-वरळी सी लिंकवर नेण्यास सांगितलं.
पुलावरून जात असताना आकाश सिंग फोनवर बोलत होता. यावेळी त्याने अचानक चालकाला सांगितलं की कारमधून फोन बाहेर पडला आहे. यामुळे चालकाने सी लिंकवर कार थांबवली. यानंतर आकाशने कारमधून खाली उतरत थेट समुद्रात उडी मारली, अशी माहिती वरळी पोलिसांनी दिली.
हेही वाचा- नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १७ वर्षीय मुलगी निघाली मास्टरमाइंड, चौघींची सुटका
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाने रात्री उशिरा आकाशचा मृतदेह बाहेर काढला. त्याने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. प्राथमिक तपासानुसार, आकाशचे तीन महिन्यांपूर्वी प्रेयसीबरोबर ब्रेकअप झाला होता.