मुंबई : सीटबेल्ट न बांधल्याप्रकरणी मुंबईत १८५ जणांवर मंगळवारी वाहतुक पोलिसांनी कारवाई केली. सीटबेल्ट प्रकरणी १० दिवस जनजागृतीवर भर देण्यात येणार असून त्यानंतर आणखी तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्याने स्पष्ट केले.
हेही वाचा… मुंबई : रखडलेल्या ५१७ प्रकल्पांसाठी झोपु प्राधिकरणाकडून विकासकांचे पॅनेल
हेही वाचा… मुंबई : दादरच्या छबीलदास शाळेत एकापाठोपाठ चार सिलिंडरचा स्फोट; जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू
सीटबेल्टप्रकरणी मुंबई शहरात सर्वाधिक कारवाई वरळी वाहतुक चौकीकडून करण्यात आली. पोलिसांनी वाहन चालकांमध्ये जनजागृती करण्याचे नियोजन केले आहे. दहा दिवस जनजागृती केल्यानतंर कारवाया आणखी तीव्र करण्यात येतील. त्याबाबत वाहतुक चौक्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. मोटार वाहन (सुधारित) कायदा, २०१९ च्या कलम १९४ बी (१) अंतर्गत सीट बेल्ट न बांधल्याबद्दल कारवाई करण्याची तरतुद आहे. त्यानुसार कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत मोटार वाहन चालक व सह प्रवासी यांनी सीटबेल्ट लावणे १ नोव्हेंबरपासून बंधनकारक करण्यात आले आहे. याबाबत वाहतुक पोलिसांनी १४ ऑक्टोबरला आदेश जारी केले होते. पुढील वा मागील आसनावर बसलेल्या सहप्रवाश्यांनी सुरक्षा बेल्ट लावला नसेल, तर वाहतुक पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे. तसेच ज्या व्यक्तींच्या मोटरवाहनात सीटबेल्टची व्यवस्था नसेल, अशा वाहन मालकांना १ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती.