मुंबई : शिर्डी-नागपूर समृद्धी महामार्गाचे उद्घाटन झाल्यापासून ११ ते २० डिसेंबर या कालावधीत एकूण २९ रस्ते अपघात झाले असून एकाचा मृत्यू झाला. तर ३३ जण जखमी झाले. शिवाय विविध वाहतूक नियमांचे उल्लंघनही वाढत असून त्यावर नियंत्रण ठेवण्यात राज्य शासनाला अपयशच आले आहे. यापैकी वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची सर्वाधिक म्हणजे ६७ प्रकरणे दाखल झाली आहेत.
नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्ग ११ डिसेंबरपासून सुरू झाला. दर्जेदार रस्त्यामुळे या दोन शहरातील अंतरही पाच तासात पूर्ण करता येणार आहे. महामार्गावर अवजड वाहनांसाठी प्रतितास ८० किलोमीटर आणि हलक्या वाहनांसाठी प्रतितास १२० किलोमीटरची वेगमर्यादा आहे. मात्र पहिल्या तीन दिवसांत दोन रस्ते अपघात झाले होते. वेगमर्यादेचे उल्लंघन करून बेदरकारपणे वाहन चालविणे, अन्य वाहनांना नियमाचे उल्लंघन करून मागे टाकणे अशा काही कारणांमुळे या महामार्गावर अपघात होत आहेत. ११ ते २० डिसेंबर या कालावधीत एकूण २९ अपघात झाल्याची माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. तर १२ जणांना गंभीर दुखापत असून २१ जणांना किरकोळ दुखापत झाली आहे. बुलढाणा जिल्ह्यात नऊ आणि जालना जिल्ह्यात आठ अपघातांची नोंद झाली आहे.
वेग मर्यादेचे उल्लंघन..
समृद्धी महामार्गावर वाहतूक नियम उल्लंघनातही वाढ झाली आहे. ११ ते २० डिसेंबपर्यंत एकूण १२५ प्रकरणे वाहतूक नियम उल्लंघनाची आहेत. ११ ते १४ डिसेंबपर्यंतच नियम उल्लंघनाची २९ प्रकरणे होती. त्यानंतर यात आणखी वाढ होत गेली आहे. गेल्या दहा दिवसांत झालेल्या उल्लंघनाच्या एकूण प्रकरणांपैकी ६७ प्रकरणे वेगमर्यादेचे उल्लंघन केल्याची आहेत. त्यापैकी पुणे परिक्षेत्रातील बाभळेश्वर वाहतूक पोलीस केंद्रांर्तगत सर्वाधिक २७ प्रकरणांची नोंद झाली. याशिवाय सुरक्षा पट्टय़ाचा वापर न केल्याने दोन आणि अनधिकृतरीत्या वाहने उभी करणे यांसह अन्य नियम उल्लंघनाच्या ५६ कारवाया करण्यात आल्या. एकूण १ लाख ६३ हजार ४०० रुपये दंडही आकारण्यात आला.
कारवाईसाठी आधुनिक वाहने..
वाहतूक नियम उल्लंघनविरोधात कारवाई करण्यासाठी नागपूर, औरंगाबाद, पुणे विभागातील वाहतूक पोलिसांवर तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचा ताफ्यातील ‘लेझर स्पीड गन’, ‘अल्कोहोल ब्रेथ ‘अॅनलायझर’ यांसह अन्य यंत्रणा असलेल्या वाहनांचा कारवाईसाठी वापर केला जात आहे.