मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून पाणी गळतीच्या घटना वारंवार घडत असल्याने मुंबईकरांना वारंवार पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. यंदा मार्च आणि एप्रिलमध्ये पाणी गळतीच्या तब्बल २ हजार ९२१ तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. यामध्ये सर्वाधिक तक्रारी या अंधेरी, जोगेश्वरी परिसरातील आहेत.
महापालिकेच्या जल अभियंता विभागातील ‘तातडीचे दुरुस्ती’ विभागाकडे गेल्या दोन महिन्यांत २ हजार ९२१ पाणी गळतीच्या तक्रारी आल्या. यापैकी १ हजार ५२६ तक्रारी निवारण्यात जलकामे विभागाला यश आले. सर्वाधिक तक्रारी अंधेरी, जोगेश्वरी पूर्व परिसरात २९४, त्याखालोखाल अंधेरी जोगेश्वरी पश्चिम परिसरात २५२ ठिकाणी, कुर्ला परिसरात २०८ तक्रारी आल्या होत्या. अनेकदा पाण्याची गळती झाल्याचे नेमके ठिकाण शोधणे ही अतिशय आव्हानात्मक आणि वेळखाऊ प्रक्रिया असते. त्यामुळे पालिकेने गळती शोधण्यासाठी ‘क्राऊलर कॅमेरा’ हा विशिष्ट कॅमेरा वापरण्याचे ठरवले आहे.
कॅमेरा असा ..
क्राऊलर कॅमेऱ्याच्या माध्यमातून गळतीचे नेमके ठिकाण, घटनास्थळाचे चित्रीकरण मिळवणे शक्य होते. अनेकदा खोदकाम करूनही नेमके ठिकाण सापडत नाही अशा ठिकाणी या कॅमेऱ्याची मदत होते.