वाढत्या तापमानामुळे वातानुकूलित लोकलच्या प्रवाशांत वाढ; मार्चच्या पहिल्या आठवडय़ातच एक लाख प्रवाशांची भर
गेल्या दीड महिन्यापासून तापमानात झालेली वाढ नकोशी वाटू लागली असली तरी, उन्हाळय़ाचे आगमन मुंबईतील वातानुकूलित लोकलच्या पथ्यावर पडले आहे. पश्चिम रेल्वे मार्गावर चालवण्यात येत असलेल्या वातानुकूलित लोकल गाडीतून प्रवास करणाऱ्यांची संख्या गेल्या महिनाभरात वाढली असून गेल्या महिनाभरात तीन लाखांहून अधिक प्रवाशांनी या गारेगार प्रवासाचा अनुभव घेतला. विशेष म्हणजे, मार्च महिन्याच्या आठवडाभरात तब्बल एक लाख ८ हजार ८१५ प्रवाशांनी एसी लोकलकडे धाव घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. येत्या दोन महिन्यांत उन्हाचा कडाका असाच वाढत राहिला तर, वातानुकूलित लोकलसाठी प्रवाशांची गर्दी उसळण्याची शक्यता आहे.
पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते बोरिवली अशी वातानुकूलित लोकल गाडी गेल्या वर्षी २५ डिसेंबरपासून सेवेत आली. या गाडीच्या सुरुवातीला सहा फेऱ्या चालविण्यात आल्या. त्यानंतर जानेवारी २०१८ पासून विरापर्यंत या लोकलचा विस्तार करण्यात आला आणि एकूण १२ फेऱ्या चालविण्यात आल्या. पहिले सहा महिने सध्याच्या प्रथम श्रेणीच्या बेस फेअरच्या १.२ पट भाडे आकारण्यात येत आहे. त्यामुळे चर्चगेट ते विरार प्रवासासाठी १,१८५ रुपये तिकीट दर, तर पासासाठी २,०४० रुपये आकारण्यात येत आहे. मात्र वातानुकूलित लोकल गाडीची योग्य नसलेली वेळ, जादा भाडे यामुळे या लोकल गाडीला प्रवासी मिळेनासे झाले. बारा डब्यांच्या या वातानुकूलित लोकलची प्रवासी क्षमता ५,९६४ सुरुवातीच्या महिनाभर दिवसाला सरासरी ३,५०० प्रवासी मिळत होते. त्यामुळे वातानुकूलित लोकल गाडीला प्रवाशांचा प्रतिसाद मिळणार का आणि उत्पन्न मिळणार की नाही असा प्रश्न उपस्थित होऊ लागला.
उकाडय़ाचे दिवस सुरू होताच प्रवाशांचा वातानुकूलित लोकल गाडीकडे हळूहळू ओढा वाढू लागला आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये २ लाख २८ हजार ८५९ प्रवाशांनी प्रवास केला असल्याची माहिती पश्चिम रेल्वेकडून देण्यात आली. त्यानंतर १ मार्च ते ८ मार्चपर्यंत प्रवाशांचा हाच आकडा १ लाख ८ हजार ८१५ एवढा आहे. त्यामुळे उत्पन्नातही चांगलीच वाढ झाली आहे. फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मिळून एकूण १ कोटी ४० लाख ७० हजार रुपये उत्पन्न मिळाले आहे. जानेवारी २०१८ मध्ये एकूण १ लाख ७७ हजार ४४७ प्रवाशांनी प्रवास केला होता. यातून ८१ लाख २५ हजार ६५५ रुपये उत्पन्न मिळाले आहे. सध्या एका आठवडय़ाचा, पंधरा दिवसाचा आणि महिन्याचा पास वातानुकूलित लोकलसाठी आहे. यापुढे तीन आणि सहा महिन्याचा पास देण्याचाही विचार पश्चिम रेल्वेकडून सुरू आहे.