मुंबई : भायखळा येथील राणीच्या बागेतील अर्थात वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणीसंग्रहालयातील पेंग्विनच्या जोड्यांना आणखी तीन पिले झाली आहेत. यामध्ये दोन नर आणि एक मादी आहे. राणीच्या बागेतील पेंग्विनची संख्या २१ झाली आहे.

राणीच्या बागेतील हंबोल्ट पेंग्विनच्या जोड्यांनी आणखी तीन पिलांना जन्म दिला आहे. त्यांचे नामकरणही करण्यात आले आहे. त्यात ऑलिव्ह आणि पोपॉय या जोडीने ४ मार्चला एका नर पिल्लाला जन्म दिला असून त्याचे नाव ‘नॉडी’ ठेवण्यात आले आहे. तर डोनाल्ड आणि डेझी या जोडीने दिलेल्या अंड्यातून ७ मार्चला एक पिलू जन्मले असून त्याचे नाव ‘टॉम’ ठेवण्यात आले आहे. तर ११ मार्चला एक मादी पिल्लू जन्मले असून तिचे नाव ‘पिंगु’ ठेवण्यात आले आहे.

ही तिन्ही पिले आता प्रदर्शन कक्षात आणण्यात आली आहेत. त्यामुळे राणीच्या बागेतील पेंग्विनची एकूण संख्या २१ झाली आहे. गेल्या चार वर्षात राणीच्या बागेत ११ नवीन पेंग्विन जन्माला आले आहेत. मुंबईच्या राणीबागेत २०१७ मध्ये दक्षिण आफ्रिकेतून ८ हंबोल्ट पेंग्विन आणण्यात आले. त्यामधील एका पेंग्विनचा त्याच वेळी मृत्यू झाला. त्यानंतर सात पेंग्विन होते. सध्या असलेल्या पेंग्विनपैकी ११ माद्या आणि १० नर आहेत.