मुंबई : गणेशोत्सवानिमित्त कोकणासाठी सोडण्यात येणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) तीन हजार गाडय़ा आरक्षित झाल्या आहेत, तर आणखी काही गाडय़ांचे आरक्षण सुरू आहे.

कोकणासाठी गुरुवारपासून (२५ ऑगस्ट) जादा गाडय़ा सुरू होत असून या दिवशी २७ गाडय़ा रवाना केल्या जाणार आहेत, तर २८ ऑगस्टला १ हजार २४१ गाडय़ा कोकणासाठी मुंबई, ठाणे, पालघरमधून निघणार असल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली.

गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाने कोकणसाठी अडीच हजार जादा गाडय़ांची घोषणा केली होती. मात्र त्यापेक्षाही जास्त गाडय़ांचे आरक्षण होत आहे. आतापर्यंत १ हजार ९५० गाडय़ा संपूर्ण आरक्षित झाल्या आहेत, तर १ हजार ६० गाडय़ांचे वैयक्तिक आरक्षण पूर्ण झाले आहे. याव्यतिरिक्त आणखी दीडशे ते दोनशे गाडय़ांचेही आरक्षण सुरू आहे.

महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, २५ ऑगस्टला २७ जादा गाडय़ा कोकणसाठी रवाना करण्यात येणार आहेत. त्यानंतर २६ ऑगस्टला १०५ , २७ ऑगस्टला १७८, २८ ऑगस्टला १ हजार २४१ आणि २९ ऑगस्टला १ हजार ४४५ एसटी गाडय़ा कोकणसाठी रवाना होतील.

पनवेल-रत्नागिरी, मडगावसाठी १२ विशेष फेऱ्या

* गणेशोत्सवनिमित्त मध्य रेल्वेकडून पनवेल-रत्नागिरी, मडगावसाठी आणखी

१२  विशेष फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आतापर्यंत गणेशोत्सवानिमित्त एकूण २१८ गाडय़ांची घोषणा करण्यात आली आहे.

पनवेल-मडगाव गणपती विशेष फेरी गाडी क्रमांक ०१५९५ ही पनवेलमधून ४ आणि ११ सप्टेंबरला सायंकाळी पावणेपाच वाजता सुटेल. गाडी क्रमांक ०१५९६ ही मडगावमधून २ सप्टेंबर आणि ९ सप्टेंबरला दुपारी तीन वाजता सुटणार आहे.

* पनवेल-रत्नागिरी गणपती विशेष फेऱ्यांमध्ये गाडी क्रमांक ०१५९१ ही पनवेलमधून ३ सप्टेंबर आणि १० सप्टेंबरला पहाटे ५.४० वाजता सुटेल आणि गाडी क्रमांक ०१५९२ रत्नागिरीतून दुपारी ३.०५ वाजता सुटेल.

* पनवेल-रत्नागिरी गणपती विशेष फेरीही गाडी क्रमांक ०१५९३ ही पनवेलमधून ४ सप्टेंबर आणि ११ सप्टेंबरला दुपारी दीड वाजता आणि गाडी क्रमांक ०१५९४ रत्नागिरीतून सकाळी ८.२० वाजता सुटणार आहे.

वातानुकूलित ‘डबल डेकर’ला जादा डबे ..

गाडी क्रमांक ११०९९ आणि १११०० एलटीटी-मडगाव वातानुकूलित ‘डबल डेकर विकली एक्स्प्रेस’ला २७ ऑगस्ट आणि गाडी क्रमांक ११०८५, गाडी क्रमांक ११०८६ एलटीटी-मडगाव ‘डबल डेकर एक्स्प्रेस’ला २९ ऑगस्टपासून दोन वातानुकूलित टू टिअर, दोन वातानुकूलित थ्री टिअर आणि एक वातानुकूलित आसन श्रेणीचा जादा डबा जोडण्यात येणार आहे.