मुंबई : पदवीच्या ३ आणि ४ वर्षीय अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची दुसरी गुणवत्ता यादी शुक्रवार, २१ जून रोजी जाहीर करण्यात आली. पहिल्या गुणवत्ता यादीच्या तुलनेत दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये ३ ते ४ टक्क्यांची घट झाली आहे.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी त्यांच्या स्तरावर संकेतस्थळावरून जाहीर केली. तर, सर्व जागांवर प्रवेश निश्चित झाल्यामुळे काही महाविद्यालयांनी संबंधित अभ्यासक्रमांसाठी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर केली नाही. मुंबई विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार दुसऱ्या गुणवत्ता यादीअंतर्गत संबंधित महाविद्यालयात जागा मिळालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची ऑनलाईन पडताळणी आणि शुल्क भरून प्रवेश निश्चिती (हमीपत्र अर्जासह) २२ ते २७ जून रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत होणार आहे.

अनिल परब यांच्या आरोपांची आयोगाकडून तपासणी

पहिल्या गुणवत्ता यादीनुसार स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये (कट ऑफ) वाढ आणि पारंपरिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश पात्रता गुणांमध्ये किंचितशी घट झालेली होती. तर दुसऱ्या गुणवत्ता यादीच्या प्रवेश पात्रता गुणांनुसार पारंपरिक अभ्यासक्रमांपेक्षा स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांसाठीचे प्रवेश पात्रता गुण चढेच राहिले आहेत. यंदा प्रथम वर्ष पदवी प्रवेशासाठी मुंबई विद्यापीठाची २ लाख ५० हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेशपूर्व ऑनलाइन नावनोंदणी केली. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या अर्जांमध्ये ‘बी.कॉम.’ अभ्यासक्रमासाठी सर्वाधिक १ लाख ८८ हजार ३९० अर्ज सादर झाले, तर याव्यतिरिक्त स्वयंअर्थसाहाय्यित अभ्यासक्रमांसाठीही सर्वाधिक अर्ज विद्यार्थ्यांनी केले आहेत.