मुंबईचे रेल्वेमार्ग मृत्यूचा सापळा बनत असल्याच्या चर्चा सुरू असताना या चर्चेला दुजोरा देतील अशा तीन घटना एकाच दिवशी एका तासात तीन गाडय़ांमध्ये घडल्या. मुंबईहून बाहेरगावी जाणाऱ्या तीन गाडय़ांच्या चार डब्यांमधील शौचकुपांमध्ये आग लागल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसवर हलकल्लोळ उडाला. सुदैवाने या गाडय़ा प्लॅटफॉर्मवर उभ्या असतानाच या चारही डब्यांमधील आगींबाबत माहिती मिळाल्याने मोठी दुर्घटना टळली. टय़ुबलाइटवरील अ‍ॅक्रेलिकचे आवरण या आगीला कारणीभूत असल्याचे मध्य रेल्वेतर्फे सांगण्यात आले. तरीही एका तासात तीन वेगवेगळ्या गाडय़ांमध्ये सारखीच घटना घडल्याने या घटनांमागे घातपाताचे कारस्थान होते का,असा संशय व्यक्त करण्यात येत आहे.
प्लॅटफॉर्म क्रमांक ८ वरून रवाना होणारी डेक्कन क्वीन, ९ वरून सुटणारी सह्याद्री एक्सप्रेस आणि १५ वर उभी असलेली मुंबई-हावडा मेल या तीनही गाडय़ांच्या डब्यांतील शौचकुपांत बुधवारी संध्याकाळी पाच ते साडेसहा या दरम्यान आगी लागल्या. सर्वप्रथम डेक्कन क्वीनच्या साधारण श्रेणीच्या डब्यातील शौचकुपातून धूर येत असल्याचे लक्षात आले. त्यानंतर सह्याद्री एक्स्प्रेसच्या एस-६ आणि बी-१ या डब्यांतही आग लागली. तर थोडय़ा वेळाने हावडा मेलच्या एस-३ या डब्यातूनही धूर धुमसू लागला.
हावडा मेलबाबतही हीच घटना घडल्यानंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सुनीलकुमार सूद घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी या तिन्ही डब्यांची पाहणी केली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली नसून उष्णतेमुळे लागल्याचे प्रथमदर्शनी पाहणीतून दिसते. या तीनही घटनांमध्ये टय़ुबलाइटबाहेर असलेले अ‍ॅक्रलिकच्या आवरण वितळले आहे. टय़ुबलाइटचा प्रकाश परावर्तित करणारे परावर्तक (रिफ्लेक्टर्स) आणि अ‍ॅक्रलिकचे आवरण यांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने ही आग लागल्याचे ब्रिगेडियर सूद यांनी सांगितले.
मात्र एकाच दिवशी एका तासाच्या अंतरात तीन गाडय़ांच्या तीन डब्यांमध्ये एकाच प्रकारे आग कशी लागू शकते, याबाबत रेल्वे अधिकाऱ्यांकडे उत्तर नाही. तसेच संध्याकाळी उशिरा महाव्यवस्थापक ब्रिगेडियर सूद, रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मुकेश निगम, रेल्वे सुरक्षा दलाचे प्रमुख आलोक बोहरा, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक आलोक बडकुल आदी अधिकारी सीसीटीव्हीतून मिळालेल्या चित्रणाची तपासणी करत होते. त्यामुळे या आगीमागे घातपाताचे कारस्थान असल्याच्या संशयाला पुष्टी मिळत आहे.

Story img Loader