मुंबईः शेअर खरेदी – विक्रीच्या नावाखाली सायबर फसवणूक करणाऱ्यांना बँक खाती उपलब्ध करून देणाऱ्या आरोपीला उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांनी अटक केली. हैदर अब्दुल कादर सय्यद ऊर्फ साहिल असे अटक आरोपीचे नाव असून आरोपी सायबर फसवणुकीत सक्रिय होता.
मालाड परिसरात वास्तव्याला असलेले ७४ वर्षीय तक्रारदार अभियांत्रिकी क्षेत्राशी संबंधित कंपनीत कामाला होते. ते १४ वर्षांपूर्वी सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी शेअर बाजारात गुंतवणूक केली होती. सप्टेंबर महिन्यात ते एका संकेतस्थळाची पाहणी करीत असताना त्यांना एक लिंक दिसली. त्यात शेअर बाजारात गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. लिंकवर क्लिक केले असता ते एका व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये सामील झाले. त्यात शेअरसंदर्भातील दैनदिन माहिती दिली जात होती. त्यानंतर त्यांना एक ॲप्लिकेशन डाऊनलोड करण्याची सूचना करण्यात आली. त्याद्वारे त्यांना वेगवेगळ्या कंपनीचे शेअर्स, आयपीओ, त्यांचे दर आदी माहिती दिसत होती. त्यामुळे त्यांना कंपनीच्या ॲपवर विश्वास बसला. या ग्रुपमध्ये अनेक सभासद होते. त्यापैकी बहुतांश सभासदांनी कंपनीच्या माध्यमातून शेअरमध्ये गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर त्यांना चांगला फायदा होत असल्याचे निदर्शनास आले.
हेही वाचा – मुंबई : आधीच बेस्टची दुर्दशा त्यात नवीन समस्या, विकासकामांमुळे बसमार्ग वळवले
याचदरम्यान त्यांना ग्रुप ॲडमिनने शेअरमध्ये गुंतवणुकीचा सल्ला देताना चांगला परतावा देण्याचे आमिष दाखविले. कंपनीवर विश्वास ठेवून त्यांच्यासह पत्नीने विविध शेअरमध्ये ३० लाख ४३ हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. या गुंतवणुकीवर काही दिवसांत त्यांना चांगला फायदा झाल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी काही रक्कम स्वत:च्या बँक खात्यात हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला. ही रक्कम त्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित झाली. त्यामुळे त्यांचा या ॲपवर अधिक विश्वास बसला होता. त्यामुळे त्यांनी पत्नीसह कंपनीच्या माध्यमातून आणखी काही शेअरमध्ये गुंतवणूक केली. गेल्या तीन महिन्यांत त्यांनी ३६ लाख ५० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती. त्यानंतर त्यांनी पुन्हा स्वत:च्या बँक खात्यात पैसे हस्तांतरित करण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी त्यांना संबंधित रक्कमेवर कर, ठेव रक्कम म्हणून तीस लाख रुपये भरण्यास सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांना संशय आला होता. त्यांनी संबंधित कंपनीशी संपर्क साधला. मात्र या कंपनीशी त्यांच्या कंपनीशी काहीही संबंध नसल्याचे उघडकीस आले.
शेअर खरेदी – विक्रीच्या नावाने बनावट कंपनी सुरू करून त्यांची फसवणूक केली होती. हा प्रकार लक्षात येताच त्यांनी उत्तर प्रादेशिक सायबर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी फसवणुकीसह माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. तांत्रिक माहितीवरून हैदर अब्दुल ऊर्फ साहिल या तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्याच्या बँक खात्यात काही रक्कम हस्तांतरित झाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. आरोपी सायबर फसणूक करणाऱ्यांसाठी बँक खाती उपलब्ध करून देत होता. अखेर त्याला याप्रकरणात अटक करण्यात आली.