सोयीसाठी असलेल्या बेस्टच्या निम्नतल बसगाडय़ा लवकरच इतिहासजमा होणार आहे. या बसगाडय़ांचे आयुर्मान संपल्याने १ एप्रिलपासून या गाडय़ा सेवेतून रद्दबातल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे अपंग प्रवाशांच्या सोयीसाठी असणाऱ्या एकमेव सेवेला पूर्णविराम लागणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र प्रवाशांची गैरसोय होऊ नये, यासाठी इतर बसगाडय़ा चालवण्यात येणार आहेत.
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अपंग प्रवाशांच्या सोयीसाठी निम्नतल (लो फ्लोअर) बसगाडय़ा बेस्ट प्रशासनाने ताफ्यात आणल्या होत्या. मात्र काही महिन्यांत या बसगाडय़ांत दुरुस्तीच्या अनेक समस्या उद्भवू लागल्या. यात प्रवाशांसह प्रशासनालाही या बसगाडय़ा सेवेत ठेवणे जिकिरीचे झाले होते. त्यात बसगाडय़ांच्या परवाना नूतनीकरणाच्या वेळी बसगाडय़ांची अवस्था बिकट असल्याची बाब प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्याने बेस्ट प्रशासनाच्या नजरेस आणून दिली. या बसगाडय़ा रस्त्यावर चालवणे योग्य नसून याला दहा वर्षे झाल्याचे कारण अधोरेखित करत बेस्टने या लो फ्लोअरच्या बसगाडय़ा अखेर रस्त्यावरून काढण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या या बसगाडय़ा फोर्ट फेरीसाठी वापरण्यात येत आहेत. यात अपंग प्रवाशांच्या सोयीसाठी ‘व्हीलचेअर’ने बसगाडय़ांत जाणे शक्य आहे. त्यामुळे काही प्रमाणात का होईना या गाडय़ा अपंग प्रवाशांच्या सोयीसाठी होत्या, असे सांगितले जात आहे. तसेच अपंग प्रवाशांच्या सोयीसाठी अशाच प्रकारच्या बसगाडय़ा सेवेत दाखल केल्या जातील अशी अपेक्षा अपंग प्रवाशांकडून केली जात आहे.

Story img Loader