मुंबई : मुसळधार पावसामुळे वडाळा – मानखुर्ददरम्यानची लोकल सेवा ठप्प झाल्यामुळे एरवी तोट्यात धावणाऱ्या मोनो रेलकडे सोमवारी प्रवाशांची पावले वळली. चेंबूर, वडाळा, दादर, लोअर परळ, लालबाग, महालक्ष्मी असा प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मोनो रेलला पसंती दिली. त्यामुळे मोनोरेलच्या प्रवासी संख्येत सोमवारी लक्षणीय, ३० टक्क्यांनी वाढ झाली. दररोज या मोनोरेल मार्गिकेवर १६ ते १७ हजार प्रवाशी प्रवास करतात, तर सोमवारी दिवसभरात २१ हजारांहून अधिक प्रवाशांनी मोनो रेलमधून प्रवास केला.

मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चेंबूर – जेकब सर्कल दरम्यान २० किमी लांबीची मोनो रेल मार्गिका बांधली आहे. मात्र ही मार्गिका सेवेत दाखल झाल्यापासून तोट्यात आहे. या मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढविण्यासाठी, मार्गिकेला तोट्यातून बाहेर काढण्यासाठी एमएमआरडीएकडून बरेच प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र त्यानंतरही मोनो रेल मार्गिकेवरील प्रवासी संख्या वाढलेली नाही. दिवसाला काही हजार प्रवासी या मार्गिकेवरून प्रवास करतात. मात्र सोमवारी मोनो रेल मार्गिकेवरील प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे निदर्शनास आले. दररोज दुपारी २ वाजेपर्यंत सहा हजार प्रवासी मोनो रेलमधून प्रवास करतात. तर सोमवारी दुपारी २ वाजेपर्यंत १० हजार प्रवाशांनी प्रवास केला होता.

हेही वाचा >>>पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ जुलै रोजी मुंबईत; गोरेगाव – मुलुंड बोगद्याच्या कामाचे भूमिपूजन

मुसळधार पावसामुळे सोमवारी सकाळपासून दुपारपर्यंत हार्बर मार्गावरील वडाळा – मानखुर्ददरम्यानची लोकल सेवा बंद होती. तर चुनाभट्टी, शीवसह अन्य ठिकाणच्या रेल्वे मार्गावर पाणी साचल्याने लोकल सेवेला फटका बसला. लोकल नसल्याने चेंबूर, ॲन्टाॅप हिल, लोअर परळ, चिंचपोकळी, दादर, नायगाव, जीटीबी नगर आदी ठिकाणी जाण्यासाठी प्रवाशांनी मोनो रेलला पसंती दर्शवली होती. त्यामुळेच दुपारी २ नंतरही प्रवासी संख्येत वाढ झाल्याचे दिसून आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. दुपारी २ वाजेपर्यंत एकूण १० हजार असलेली मोनो रेलची प्रवासी संख्या सायंकाळी ७ वाजता १८ हजारावर पोहोचली. तर दिवसभरात मोनो रेल मार्गिकेवरून २१ हजार प्रवाशांनी प्रवास केला. एकूणच मोनोरेलच्या दैनंदिन प्रवासी संख्येत वाढ झाली आणि यातून एमएमआरडीएच्या महसुलातही मोठी भर पडली.

मुसळधार पावसात लोकल सेवा कोलमंडली असताना मोनोरेल मार्गिकेवरील गाड्या सुरळीत आणि वेळेत धावत होत्या. महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांच्या आदेशानुसार मागील काही महिन्यात मोनो गाड्यामध्ये अनेक बदल करण्यात आले आहेत. परिणामी, मोनो गाड्या सुरळीत धावत असल्याचे चित्र आहे.

मेट्रो २ अ आणि ७ मार्गिकेलाही चांगला प्रतिसाद

मुंबईची लोकल सेवा पावसात विस्कळीत झाल्यावर मोनो रेलसह प्रवाशांनी प्रवासासाठी मेट्रोचाही पर्याय निवडला. मोनो, मेट्रोला पावसाचा फटका बसत नसल्याने, मुसळधार पावसातही मेट्रो, मोनो सुरळीत धावतात. सोमवारी मेट्रो २ अ (दहिसर-अंधेरी पश्चिम) आणि मेट्रो ७ (दहिसर-गुंदवली) मार्गिकेला चांगला प्रतिसाद मिळाला. सोमवारी सायंकाळी या दोन्ही मार्गिकांवरून एक लाख ४१ हजार ९४९ प्रवाशांनी प्रवास केला. तर या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रो गाड्या सुरळीत धावत होत्या.