महाव्यवस्थापकांची माहिती; अपघातग्रस्तांना वेळेत उपचार मिळण्यात अडथळे
मुंबई : मुंबई उपनगरीय रेल्वेमार्गावर होणाऱ्या अपघातांत हजारो प्रवाशांना प्राण गमवावे लागत असतानाच मध्य रेल्वेवरील ७६ स्थानकांपैकी ३० स्थानकांबाहेर रुग्णवाहिकाच उपलब्ध नसल्याचे समोर आले आहे.
अपघातानंतर एका तासात अपघातग्रस्ताला उपचार मिळणे गरजेचे असते. मात्र रुग्णवाहिकाच उपलब्ध होऊ न शकल्याने प्रवाशांना प्राण गमवावे लागत आहेत. स्थानकात वैद्यकीय सुविधा देणे हे रेल्वेचे काम आहे, तर रेल्वे स्थानकात रुग्णवाहिका उपलब्ध ठेवणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे, असे मध्य रेल्वे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले. ३० स्थानकांत राज्य सरकारची १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका सेवा देण्यात यावी, यासाठी पत्रव्यवहारही करण्यात येत असल्याचे शर्मा यांनी सांगितले.
रेल्वेमार्गावर होणारे अपघात टाळण्यासाठी ‘एक सफर, रेल के साथ’ ही मोहीम मध्य रेल्वेकडून राबविली जात आहे. या मोहिमेअंतर्गत अनेक चित्रपट कलाकारांकडून जनजागृती करण्यात येत आहे. ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांचा रूळ ओलांडल्यामुळे निर्माण होणारे धोके दाखवून देणारा संदेश मध्य रेल्वेने बुधवारी प्रदर्शित केला. त्या वेळी त्यांनी ही माहिती दिली. मात्र अपघात झाल्यानंतर त्या प्रवाशाला रुग्णालयात पोहोचविण्यासाठी रुग्णवाहिकाच उपलब्ध होत नाही. त्यामुळे प्रवाशाला प्राणही गमवावे लागतात. त्यामुळे ३० स्थानकांत ही सेवा देण्यात यावी, अशी विनंती मध्य रेल्वेने राज्य सरकारला एका पत्राद्वारे केल्याचे शर्मा यांनी सांगितले.
मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बर मार्गावर एकूण ७६ स्थानके आहेत. सर्वाधिक अपघात होणाऱ्या २० स्थानकांत १०८ क्रमांकाची, तर दोन स्थानकांत खासगी रुग्णवाहिका सेवा उपलब्ध आहेत. सध्या मध्य रेल्वेला आणखी ३० स्थानकांत रुग्णवाहिकेची सेवा हवी आहे. या स्थानकांची यादी त्यांनी राज्य सरकारला दिली आहे. ९ ऑक्टोबर रोजी मध्य रेल्वेने राज्य सरकारकडे शेवटचा पत्रव्यवहार केला असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. मध्य रेल्वेच्या मुख्य व हार्बरवरील इतर २४ स्थानकांत अपघातांचे प्रमाण फारच कमी आहे. त्यामुळे या स्थानकांत सध्या तरी रुग्णवाहिकेची गरज नाही. त्यामुळे आणखी ३० स्थानकांत रुग्णवाहिका सेवा उपलब्ध करण्याची मागणी राज्य सरकारकडे करण्यात आली आहे.
रुग्णवाहिका नसलेली अपघातप्रवण स्थानके
मस्जिद बंदर, डॉकयार्ड रोड, कॉटर्न ग्रीन, शिवडी, जीटीबी नगर, किंग्ज सर्कल, चुनाभट्टी, चेंबूर, गोवंडी, जुईनगर, नेरूळ, बेलापूर, तुर्भे, कळवा, मुंब्रा, दिवा, कोपर, ठाकुर्ली, विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, कर्जत, शहाड, आंबिवली, टिटवाळा, खडवली, आसनगाव, कसारा, भिवंडी