मुंबईः सुमारे ३०० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारातील रक्कम खात्यात हस्तांतरित झाल्याची भीती दाखवून  म्हाडामधील महिला उपअभियंत्याकडून खंडणी उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोपींनी सुमारे तीन लाख रुपयांची खंडणी वसूल केली असून याप्रकरणी रवी दहिया, संजय सिंह, गणेश गायतोंडे आणि विजयन अशी नावे सांगणार्‍या चौघांविरुद्ध खैरवाडी पोलिसांनी फसवणूक, खंडणी, व माहिती तंत्रज्ञान प्रतिबंधक कायद्याअंतर्गत  गुन्हा दाखल केला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

४१ वर्षांची तक्रारदार महिला प्रतीक्षानगरात राहत असून म्हाडामध्ये उपअभियंता म्हणून नोकरी करतात. ८ नोव्हेंबरला त्या कार्यालयात काम करीत होत्या. यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीचा दूरध्वनी आला. दूरध्वनी करणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव रवी दहिया असल्याचे सांगितले. आपण टेलिकॉम ॲथोरिटी ऑफ इंडियामधून बोलत असल्याचे त्याने सांगितले. तुमचा मोबाइल क्रमांक बंद होणार आहे. तुमच्या नावाने एक सिमकार्ड घेण्यात आले असून या सिमकार्डवरून काही लोकांना अश्‍लील संदेश पाठविण्यात आले आहे, असे त्याने सांगितले. त्यानंतर त्याने तक्रारदार महिलेचा दूरध्वनी दुसऱ्या अधिकाऱ्याकडे दिला. त्या व्यक्तीने स्वतचे नाव संजय सिंह सांगितले. त्याने तक्रारदार आधारकार्डचा अनधिकृत वापर होत असल्याचे सांगून तिच्या व्हॉटअप एक संदेश पाठविला होता. त्यानंतर त्याने तिला व्हिडीओ कॉल केला.

हेही वाचा >>>पश्चिम रेल्वेची सेवा खोळंबली

दूरध्वनी सुरू असताना त्याने तो सायबर सेल विभागाकडून बोलत असल्याचे सांगितले. त्याचे वरिष्ठ अधिकारी गणेश गायतोंडे महिलेशी बोलणार असल्याचेही त्याने सांगितले. त्यानंतर गणेशने त्यांना पूजा म्हात्रे या महिलेने तीनशे कोटी रुपयांचा आर्थिक गैरव्यवहार केला असून त्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.  लग्नापूर्वी महिलेच्या नावाने एका बँकेत खाते उघडण्यात आले होते. या खात्यात याच आर्थिक फसवणुकीतील २६ लाख २८ हजार रुपये हस्तांतरित झाले होते. ही बाब अतिशय गंभीर आहे. त्यामुळे तिच्याविरुद्ध गुन्हा दाखल होणार असून कोणत्याही क्षणी तिला अटक होणार असल्याची भीती दाखविली होती. या माहिती ऐकून सदर महिलेला प्रचंड मानसिक धक्का बसला होता. त्यानंतर गणेशसह विजयन नावाच्या व्यक्तीने महिलेच्या बँक खात्याची माहिती काढून तिला या कारवाईपासून वाचायचे असेल तर त्यांना पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. तिला वेगवेगळ्या बँक खात्यात तीन लाख रुपये हस्तांतरित करण्यास प्रवृत्त करण्यात आले.

हा प्रकार नंतर तिने पतीला सांगितला. त्याने हा फसवणुकीचा प्रकार असल्याचे सांगून तिला पोलिसांत तक्रार करण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर तिने खेरवाडी पोलिसांना घडलेला प्रकार सांगून संबंधित चार आरोपींविरोधात तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी चारही आरोपींविरुद्ध खंडणीसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. बँक व्यवहाराच्या माध्यमातून पोलीस याप्रकरणी तपास करीत आहेत.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 300 crore extortion from female officer on fear of involvement in embezzlement mumbai print news amy